‘खबरी’ असल्याच्या संशयावर एकावर जीवघेणा हल्ला! हत्यारांचा ‘मुक्त’ वापर; तडीपाराला संगमनेरात बोलावून मारहाण..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरात बेकायदेशीपणे सुरु असलेल्या गोवंश कत्तलखान्यांची पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरुन सहा जणांनी एकावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत तलवारी, लोखंडी रॉड, लाकडी दांडके यासारख्या हत्याचारांचा मुक्त वापर करण्यात आला. विशेष म्हणजे ज्यांनी हल्ला केला, त्यांनीच जखमी तरुणाला पुन्हा त्याच्या घराजवळ आणून सोडून दिले. या प्रकारामागे संगमनेरातील गोवंश कत्तलखान्यांचा म्होरक्या नवाज कुरेशी याचा हात असल्याचा आरोप हल्ल्यात जखमी कासिफ असद कुरेशी याने केला असून त्यावरुन पोलिसांनी एकूण सातजणांवर घातक शस्त्रांचा वापर करुन जखमी करण्यासह बेकायदा जमाव जमवून दंगल घडवणे व भारतीय शस्त्र कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणातील जखमी तरुण तडीपार असून आरोपींनी त्याला संगमनेरला बोलावून हल्ला केल्याचे त्याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार कत्तलखान्यांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारतनगर परिसरात घडला. या परिसरात राहणार्‍या कासिफ असद कुरेशी (वय 24) याला सध्या अहमदनगर जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. त्याच्या तक्रारीनुसार तो नाशिकरोड येथे राहून तडीपारी भोगत असताना बुधवारी (ता.21) रात्री आठच्या सुमारास त्याला संगमनेरातील अब्दुल समद कुरेशी याने फोन करुन ‘तुझ्याशी बोलायचे आहे’ असे म्हणतं त्याला संगमनेरला येण्यास सांगितले. त्यानुसार कासिफ कुरेशी नाशिकरोडहून रात्री साडेअकराच्या सुमारास संगमनेरात आला व भारतनगरमधील आपल्या घरी गेला. त्यानंतर काही वेळातच अब्दूलने त्याला पुन्हा फोन करुन विचारणा केली आणि लागलीच तो त्याच्या घरीही पोहोचला आणि त्याला सोबत असलेल्या दोनमधील एका कारमध्ये बसवून समनापूरमधील एका रिकाम्या प्लॉटमध्ये घेवून गेला.


यावेळी अब्दुल कुरेशी याच्यासह साहील उर्फ साह मुस्ताक कुरेशी (रा.कोल्हेवाडी रोड), अयाज हबीब कुरेशी (रा.मदिनानगर), अकिब हरुण कुरेशी (रा.भारतनगर), तन्वीर अस्लम पठाण व इस्माईल उर्फ भय्यु नासीर पठाण (दोघेही रा.नाईकवाडपूरा) इत्यादी तरुण होते. समनापूरातील ‘त्या’ प्लॉटवर गेल्यानंतर त्या सर्वांमध्ये बोलणे सुरु असतानाच अब्दुल समद कुरेशी याने नवाज कुरेशी याला फोन केला. त्यावेळी त्याने ‘त्याला मारुन टाका, जीवंत सोडू नका..’ असे फर्मान सोडले. त्यानंतर अब्दुलने लागलीच त्याच्या आदेशाची तामीली करताना आपल्या हातातील तलवारीने कासिफ कुरेशीच्या डोक्यात घाव घातला. ईस्माईल कुरेशी व अकिब कुरेशी या दोघांनी त्याचे हात धरले. त्याचवेळी अकिबने त्याच्या पायावर लोखंडी रॉडने तर, ईस्माल कुरेशीने लाकडी दांड्याने त्याच्या पाठीवर प्रहार करण्यास सुरुवात केली.


यावेळी बाकीच्या चौघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. त्यात कासिफ रक्तबंबाळ होवून खाली कोसळला. त्यानंतर इतर मारेकरी निघून गेले तर, इस्माईल व अयाज कुरेशी यांनी त्याला उचलून त्यांच्या कारमध्ये बसवले कुरण रोडवरील एका अ‍ॅटोमोबाईल्सच्या शोरुमजवळ आणले व रेहान गुलाम नवी कुरेशी व मकसूर फिरोज कुरेशी यांना तेथे बोलावून घेत जखमी कासिफला त्यांच्या ताब्यात देवून ते दोघेही निघून गेले. या घटनेनंतर तेथे आलेल्या दोघांसह जखमीच्या नातेवाईकांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असतानाच शुक्रवारी (ता.23) रात्री पोलिसांनी रुग्णालयात जावून त्याचा जवाब नोंदवला.

त्यावरुन पोलिसांनी मारहाण करणार्‍या सहाजणांसह त्यांना मारहाणीचे आदेश देणार्‍या आणि संगमनेरातील गोवंश कत्तलखान्यांचा म्होरक्या समजल्या जाणार्‍या नवाज कुरेशी याच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 189 (2) बेकायदा जमाव, 191 (2) दंगल घडवणे, 190, 118 (1) घातक शस्त्रांचा वापर करुन गंभीर दुखापत करणे, मारहाण करणे यासह भारतीय शस्त्र कायद्याच्या कलम 4/25 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेने कसायांचा परिसर समजल्या जाणार्‍या भारतनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अभंग यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.


या प्रकरणात मारहाण करण्यात आलेल्या तरुणाला संगमनेर पोलिसांच्या प्रस्तावावरुन एका वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. मात्र हल्लेखोरांनी त्याला नाशिकरोडहून संगमनेरला बोलावून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तरुणावर कत्तलखान्यांबाबत पोलिसांना माहिती देत असल्याचा संशय आहे, त्यावरुनच संगमनेरातील गोवंश कत्तलखान्यांचा म्होरक्या मानल्या जाणार्‍या नवाज कुरेशी याच्या सांगण्यावरुन सहाजणांनी त्याला तलवार, लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे यातील जखमी तरुण तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन प्रतिबंधित क्षेत्रात आला होता, त्यामुळे त्याच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Visits: 6 Today: 1 Total: 19308

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *