कुरकुंडीतील खंडोबा माळ व डेरा डोंगर आगीत बेचिराख! नागरिकांच्या मदतीने वन विभागाला आग विझविण्यात यश

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कुरकुंडी गावांतर्गत असलेल्या खंडोबाचा माळ व डेरा डोंगराला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी (ता.5) दुपारी घडली. या आगीमध्ये अनेक छोटी-मोठी झाडे जळून खाक झाली असून एका शेतकर्‍याच्या डाळींब बागेलाही फटका बसला आहे. रात्री उशीरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करुन आग विझविण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळून वनसंपदाही बचावली आहे.

पठारभागातील कुरकुंडी गाव हे चारही बाजूंनी डोंगरदर्‍यांनी वेढलेले आहे. येथील डोंगरांवर वनवृक्षांसह, इतर वृक्षे व गवत आहे. खंडोबाचा माळ व डेरा डोंगरावर शुक्रवारी भर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उन्हाच्या तडाख्यात अचानक आग लागली. उन्हामुळे आगीची तीव्रता वाढत गेल्याने काही वेळातच आगीने संपूर्ण डोंगर वेढला. यामध्ये वनवृक्षांसह, इतर वृक्ष, गवत व जीव-जंतू आगीमध्ये खाक झाली. दरम्यान, घटनेची माहिती समजताच फुलांचे व्यापारी दिलीप आहेर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, भानुदास पवार, अभिषेक माळी, अमोल कर्डक, संतोष जाधव, गणेश टोकरे, दत्तात्रय माळी, अक्षय पवार, कुरकुंडीच्या सरपंच शाहीन चौगुले, भरत वायाळ, पप्पू चौगुले, अमीर शेख, मुक्तार शेख, गौतम पवार, आंबीखालसाचे सामाजिक कार्यकर्ते हसन सय्यद, विक्रम घोलप, कारभारी वायाळ, वन परिमंडल आधिकारी रामदास थेटे, दिलीप उचाळे, सुभाष धानापुणे, सविता थोरात, सुजाता टेंबरे, दिलीप बहिरट, बाळासाहेब वैराळ, सुखदेव गाडेकर आदिंनी डोंगराच्या दिशेने धाव घेतली.

आगीचे रौद्ररुपय पाहून जमलेल्यांनी लिंब, निलगिरी वृक्षाच्या फांद्यासह मिळेल त्या माध्यमातून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, एकीकडे वारा तर दुसरीकडे उन्हाचा तडाखा यामुळे आग विझवण्यात अडचणी आल्या. अखेर रात्री उशिरापर्यंत प्रयत्नांची शर्थ करत आग विझविण्यात आली. या आगीत डोंगरानजीक असणार्‍या शेतकरी विक्रम घोलप यांच्या डाळींब बागेलाही चांगलाच फटका बसला. यामध्ये त्यांची अनेक झाडे जळून गेली आहेत. मात्र, आगीचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.

पर्यावरण संवर्धनासाठी शासनासह अनेक स्वयंसेवी संस्था काम करत आहे. आता कुठे उन्हाळा सुरू झाला असून नागरिकांनीही वनसंपदा वाचविण्यासाठी काळजी घेणे गरजेची आहे. तर वन विभागाने देखील उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंगरांना आग लागण्यापासून खबरदारी घेण्याची गरज आहे.

Visits: 201 Today: 2 Total: 1788764

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *