अकोले तालुक्यातील ग्रामसेवकांचे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच! देवठाणच्या ग्रामसेवकाचे निलंबन केल्याचे प्रकरण; विविध संघटनांचा पाठिंबा

नायक वृत्तसेवा, अकोले
देवठाण ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकार्‍यांचे अन्यायकारकरित्या निलंबन करण्यात आले आहे. या विरोधात ग्रामसेवक संघटनेने पुकारलेले बेमुदत काम बंद आंदोलन तीव्र झाले असून त्याला जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटना, अकोले तालुका सरपंच व पेसा सरपंच परिषदेने पाठिंबा दिला आहे. आज आंदोलनाचा पाचवा असून विविध क्षेत्राकडून पाठिंबा मिळत आहे.
देवठाण ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आर. के. वर्पे यांना आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या निषेधार्थ अकोले तालुक्यातील ग्रामसेवकांनी पंचायत समितीसमोर बुधवारपासून (ता.3) काम बंद आंदोलन सुरू केले असून त्याला जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे.

वास्तविक ग्रामविकास अधिकारी वर्पे यांच्याकडे देवठाणसह समशेरपूरचाही अतिरिक्त कारभार आहे. जिल्हा परिषद स्तरावर आर्सेनिक अल्बम वाटपाचा निर्णय उशिरा घेण्यात आला. त्यानंतर ह्या गोळ्या पंचायत समितीत दोन महिने पडून होत्या. या गोळ्या वाटपाची जबाबदारी आरोग्य विभागाची असताना ग्रामसेवकांना देण्यात आली. देवठाण गावची निवडणूक असल्याने मुदत संपल्यानंतर तिथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. ही वस्तुस्थिती असताना वर्पे यांना आपली बाजू मांडण्याची संधी न देता न्यायदत्त अधिकार डावलून एकतर्फी निलंबनाची कारवाई करण्यात आली असा संघटनेचा आरोप आहे. तालुक्यातील काही गावांना अजूनही आर्सेनिक अल्बम गोळ्या मिळालेल्या नाहीत. मग वर्पे यांच्यावर कारवाई का केली? असा प्रश्न ग्रामसेवक संघटनेने उपस्थित केला आहे.

दरम्यान, ग्रामविकास अधिकारी वर्पे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यामुळे ग्रामसेवकांमध्ये ग्रामपंचायतच्या कामाबाबत भीती व अनास्था निर्माण झाली आहे. यापूर्वीही विस्तार अधिकारी के. डी. सरोदे व गटविकास अधिकारी ई. टी. चौधरी यांनी अर्थिक हेतूने प्रेरीत होऊन जिल्हा परिषदेकडे चुकीचे व दिशाभूल करणारे अहवाल पाठवून ग्रामसेवकांचे निलंबन केलेले आहे. त्यामुळे 3 मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत असून ते तीव्र करण्याचा इशारा ज्ञानेश्वर सुर्वे, संतोष देशमुख, एस. के. सोनार, एन. जी. भोपे, जे. डी. रहाणे, जे. के. काशिद, डी. पी. नवले, एस. डी. दुशिंग, एस. एस. गोडे, के. एस. सगभोर, आर. एस. जगताप, उज्ज्वला अरगडे, डी. एस. गुळवे, ए. एस. रासकर, एस. डी. पवार, टी. ए. भांगे, के. एस. साबळे आदिंसह 111 ग्रामसेवकांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *