कोठे बुद्रुक परिसरात दरडी कोसळून थेट रस्त्यावर! तरुणांनी राबविले मदतकार्य; सुदैवाने दुर्घटना टळली


नायक वृत्तसेवा, घारगाव
तालुक्यातील कोठे बुद्रुक गावांतर्गत असलेल्या खळई (अमृतनगर) येथील पेमर्‍या डोंगराच्या दरडी कोसळून थेट रस्त्यावर आल्याची घटना रविवारी (ता.26) सायंकाळी घडली होती. त्यानंतर काही तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील दरडी बाजूला घेत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव ते कोठे बुद्रुक रस्त्यावरील खळई (अमृतनगर) येथील पेमर्‍या डोंगराच्या पायथ्याशी एक वस्ती आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी झालेल्या भीज पावसामुळे पेमर्‍या डोंगराच्या दरडी थेट रस्त्यावर आल्या. यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. या घटनेची माहिती मिळताच किशोर भालके, विकास दुधवडे आदी तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी रस्त्यावरील सर्व दरडी बाजूला घेत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. तत्पूर्वी जर या दरडी थेट रस्त्यावरून खाली असलेल्या वस्तीवर आल्या असत्या तर मोठी दुर्घटना घडली असती. परंतु सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

दरम्यान, यापूर्वी देखील असाच प्रकार कोठे खुर्द येथे गेल्या वर्षी घडला होता. यासाठी संबंधित विभागाने पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणत्याच उपाययोजना न केल्याने हे प्रकार घडत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. किमान आता तरी दखल घेऊन ही समस्या दूर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यापूर्वी कोठे खुर्द येथेही दरड कोसळण्याची घटना घडली होती. मात्र, त्यानंतरही संबंधित विभागाने कोणतीच दखल घेतली नाही. यामुळे यावर्षीही कोठे बुद्रुक परिसरामध्ये असा प्रकार घडला आहे. त्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात.
– किशोर डोके (उपजिल्हाध्यक्ष-मनसे)

Visits: 17 Today: 1 Total: 115145

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *