शीवरस्त्याचे काम बंद पाडणार्या गावपुढार्याचा केला निषेध खोकरचे सरंपच आणि काही सदस्यांसह ग्रामस्थांचा सहभाग

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील खोकर-भोकर शीवरस्त्यास मंजुरी मिळून सार्वजनिक बांधकाम खाते काम करण्यास तयार होते. मात्र केवळ मी सांगितलेला रस्ता होत नसल्याच्या रोषातून एका गाव गावपुढार्याने हे काम बंद पाडले. दोन गावांच्या शीवरस्त्याचे काम बंद पाडणार्या गावपुढार्याचा खोकरचे सरपंच व काही सदस्यांसह ग्रामस्थांनी निषेध केला आहे.

खोकर येथे आमदार लहू कानडे यांच्या विकास निधीतून खोकर-पाचेगाव रस्ता मजबुतीकरणासाठी गेल्या वर्षी निधी मंजूर झाला. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या रस्त्याची पाहणी झाली. परंतु तेथे रस्त्यासाठी आवश्यक असलेली तेरा फुटाची रूंदी, साईडपट्टी, साईड गटार यासाठी आवश्यक असलेली रूंदी उपलब्ध होईना. गेल्या वर्षापासून या कामाचा निधी पडून आहे. मुदत संपल्याने संबंधित ठेकेदारास प्रतिदिन दंड सुरू झाला. अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याने ग्रामपंचायतीशी संपर्क करत पर्याय शोधा, अन्यथा निधी परत जाऊ शकतो, अशी सूचना केली.

त्यानंतर ग्रामपंचायतीने जूनमध्ये झालेल्या मासिक बैठकीत खोकर-भोकर या दोन गावच्या शेतकर्यांसाठी उपयोगात येणार्या या रस्त्यास प्राधान्य दिले. तसा ठराव बहुमताने मंजूर झाला आणि ग्रामपंचायतीने कागपत्रांची जुळवाजुळव करत तो निधी या रस्त्यास वापरण्याची मागणी केली. त्यास मंजुरी मिळाल्याने खोकरच्या सरपंच आशा चक्रनारायण, निवडक ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम खात्याचे कुलकर्णी यांच्या साक्षीने प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली.

परंतु खोकर येथील गावपुढार्याने संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांना फोन करून सदरचे काम बंद पाडले, असा आरोप प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरणामुळे खोकर व भोकर या दोन्ही गावच्या शेतकर्यांसह इतरांनाही लाभ होणार होता. परंतु केवळ एकाच्या आडेलतट्टूपणामुळे या रस्त्याचे काम बंद पडले आहे. यात आमदार कानडे यांनी लक्ष घालून शेतकर्यांच्या रस्त्याचा प्रश्न सोडवावा. अन्यथा दोन्ही गावांतील या रस्त्याचे लाभार्थी शेतकरी व ग्रामस्थ यापुढे कानडेंच्या या परिसरातील कार्यक्रमांवर बहिष्कार घालतील असा इशारा या पत्रकात देऊन गावच्या विकास कामांत अडथळा निर्माण करणार्या खोकर येथील त्या गावपुढार्याचा निषेध करत असल्याचे जाहीर करण्यात आले.

सदर प्रसिद्धी पत्रकावर सरपंच आशा चक्रनारायण, माजी सरपंच लक्ष्मण चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य राजू चक्रनारायण, ताजखाँ पठाण, संतोष गव्हाणे, संजय पुंड, सुभाष गिरमे, अशोक चव्हाण, दीपक चक्रनारायण, सोपान सलालकर, गोरख सलालकर, संतोष बिरदौडे, रावसाहेब वाकडे, अंकित मते, प्रदीप पटारे, ज्ञानेश्वर गाढे, दगडू खंडागळे, शरद दळवी, कारभारी मुंढे आदिंच्या सह्या आहेत.
