सारोळे पठार ग्रामपंचायतीत सहव्वीस लाखांचा अपहार! विद्यमान उपसरपंचासह ग्रामसेवकावर घारगावात गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गावच्या नागरिकांनी विश्वासाने निवडून दिलेल्या पदाधिकार्यानेच गावातील लोकांचा विश्वास घात करुन स्वतःच्या तुंबड्या भरण्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार या दुष्काळी गावात सदरचा गंभीर प्रकार घडला असून तेथील विद्यमान उपसरपंचाने लोकसेवक असलेल्या ग्रामसेवकाला हाताशी धरुन आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दोघांनी मिळून तब्बल 106 वेळा स्वतःच्या नावाने धनादेश काढून शासनाच्या विविध योजनांतील 25 लाख 21 हजार 911 रुपयांचा अपहार केला आहे. ही बाब समोर आल्यानंतर पंचायत समितीच्यावतीने संबंधितांवर फसवणूकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृत्ताने पठारभागासह संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत दैनिक नायकच्या हाती लागलेल्या माहितीनुसार सारोळे पठार येथील एका इसमाने 25 जानेवारी 2021 रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांकडे सारोळे पठार ग्रामपंचायतीमध्ये शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार करुन चौकशीची मागणी केली. त्यानुसार गटविकास अधिकार्यांनी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करुन 10 फेब्रुवारी 2021 रोजी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार समितीने करुन सन 2012-13 ते 2017-18 या कालावधीत सारोळे पठारचे तत्कालीन सरपंच प्रशांत गवराम फटांगरे व ग्रामसेवक सुनील शंकर शेळके यांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार, अनियमितता व अपहार झाल्याचा अहवाल 31 जुलै 2020 रोजी गटविकास अधिकार्यांना सोपविला.

यानंतर या दोघांनाही वेळोवेळी नोटीसा बजावून आपले म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले. सरपंच फटांगरे यांनी यासर्व नोटीसांना केराची टोपली दाखवली, मात्र ग्रामसेवक शेळके यांनी 1 ऑक्टोबररोजी आपले म्हणणे सादर केले. त्याची पडताळणी करुन 10 नोव्हेंबररोजी अंतिम अहवाल सादर करण्यात आला. त्यात शासनाने ज्याबाबींसाठी निधी दिला होतात्याचे अंदाज पत्रक घेणे, मुल्यांकन करुन घेणे, त्याला मासिक सभेत ग्रामपंचायतीची मंजूरी घेणे या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन दोघांनीही संगनमताने वरील कालावधीत सरपंच प्रशांत गवराम फटांगरे यांनी 11 लाख 72 हजार 155 रुपयांचा धनादेश स्वतःच्या नावाने काढले आणि संयुक्त जबाबदारी असलेल्या एकूण रकमेच्या (8 लाख 83 हजार 131 रुपये) 50 टक्के रक्कम 4 लाख 41 हजार 565 रुपये असे मिळून एकूण 16 लाख 13 हजार 720 रुपयांचा सरपंच फटांगरे यांनी अपहार केला.

तसेच लोकसेवक असलेल्या सुनील शंकर शेळके यांनी 4 लाख 66 हजार 626 रुपयांसह संयुक्त जबाबदारी असलेल्या एकूण रकमेच्या (8 लाख 83 हजार 131 रुपये) 50 टक्के रक्कम 4 लाख 41 हजार 565 रुपये असे मिळून एकूण 9 लाख 8 हजार 191 रुपयांचा धनादेश काढून त्याचा अपहार केला. वरील कालावधीत सरपंच प्रशांत फटांगरे यांनी तब्बल 82 वेळा तर ग्रामसेवक शेळके यांनी 24 वेळा स्वतःच्या नावाने धनादेश काढून सारोळे पठार गावाच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त झालेला 25 लाख 21 हजार 911 रुपयांचा गैरव्यवहार केला. वारंवार धनादेशाद्वारे इतकी मोठी रक्कम काढली जावूनही पंचायत समितीला या गैरव्यवहाराचा थांगपत्ता लागला नाही ही गोष्ट संशय निर्माण करणारी आहे.

याप्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील गुलाबराव माळी यांनी घारगाव पोलीस ठाण्यात सारोळे पठारचे तत्कालीन सरपंच तथा विद्यमान उपसरपंच प्रशांत फटांगरे व लोकसेवक (ग्रामसेवक) सुनील शेळके या दोघांविरोधात फसवणूक व अपहार केल्याची फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या दोघांविरोधात भा.द.वी.कलम 420, 409, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप दोघांपैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. इतक्या मोठ्या कालावधीत इतक्या मोठ्या रकमेचा अपहार होवून व संबंधित पदाधिकार्याचा कार्यकाळ संपूनही पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना त्याची माहिती न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या वृत्ताने संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतींध्ये खळबळ उडाली आहे.

सदरचा गैरव्यवहार सारोळेपठार येथील एका इसमाच्या तक्रार अर्जाने उघड झाला. सन 2012-13 ते 2017-18 या कालावधीत झालेल्या या गैरव्यवहारात सरपंच प्रशांत गवराम फटांगरे यांनी तब्बल 82 वेळा आपल्या स्वतःच्या नावाने धनादेश काढून 16 लाख 13 हजार 720 रुपयांचा तर ग्रामसेवक सुनील शंकर शेळके यांनी 24 वेळा आपल्या नावे धनादेश काढून 9 लाख 8 हजार 191 रुपये असा एकूण 25 लाख 21 हजार 911 रुपयांचा अपहार केला. पाच वर्षांच्या कालावधीत या दोघांनी तब्बल 106 वेळा स्वतःच्या नावाने धनादेश काढून इतकी मोठी रक्कम लाटूनही पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना त्याचा थांगपत्ता लागू नये याबाबत त्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

