भारतीय स्टेट बँकेकडून आत्मा मालिक गुरुकुलला संगणक लॅब कोविड सुरक्षेसाठी आत्मा मालिक व शासकीय रुग्णालयाला दिली पीपीई किट
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
भारतीय स्टेट बँकेच्या प्रशासनिक कार्यालय, पुणे कॉर्पोरेट सामाजिक दायित्व विभागाच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गर्ल्स गुरुकुलसाठी 34 अत्याधुनिक संगणक लॅब देण्यात आली आहे. याचे लोकार्पण नुकतेच बँकेच्या दक्षिण महाराष्ट्राच्या व्यवस्थापिका सुखविंदर कौर यांचे हस्ते करण्यात आले. तसेच आत्मा मालिक रुग्णालय व जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी कोविड 19 सुरक्षेसाठी पी.पी.ई. किटही प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना व्यवस्थापिका कौर म्हणाल्या की, ‘बेटी बचाओ, बेटी बढाओ’ या अभियानाला स्टेट बँकेने आपला पाठिंबा दिला असून, त्याअंतर्गत मुलींनाही अत्याधुनिक शिक्षण मिळावे या उद्देशाने स्टेट बँकेने ही संगणक लॅब आत्मा मालिकला उभारून दिली आहे. आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये आत्मा मालिक माऊलींच्या अध्यात्मिक संस्काराच्या छायेत नवी पिढी घडत आहे. गुणत्तापूर्ण शिक्षणाच्या बाबतीत आत्मा मालिकने महाराष्ट्रात गौरव संपन्न केलेला आहे. आत्मा मालिकच्या या कार्यात स्टेट बँकेचेही योगदान राहील याचा चिरंतन मनस्वी आनंद राहील.
सदर कार्यक्रमासाठी राजीव गुप्ता, रजनीश वर्मा, श्री.मोहिते, श्री.मिश्रा, बी.जे.प्रसाद, ज्ञानेश्वर टाकळे आदी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी, ध्यानपीठाचे सरचिटणीस हनुमंत भोंगळे, विश्वस्त प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, श्रीधर गायकवाड, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, सुधाकर मलिक, प्राचार्य माणिक जाधव, कांतीलाल पटेल, निरंजन डांगे, संदीप गायकवाड, नितीन सोनवणे, मीनाक्षी काकडे आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी करंडे हिने मनोगत व्यक्त केले तर समीक्षा लोंढे, मयुरी खांडवी, तेजस्विनी पाटील, स्वराली खोडे या गुणवंत विद्यार्थीनींचा स्टेट बँकेच्यावतीने सत्कार करण्यात आला. देसाई सर व तांबे मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी सरचिटणीस भोंगळे यांनी आभार मानले.