आंबेडकरी संघटनांच्या आंदोलनासाठी पोलिसांचा ‘रास्ता रोको’! नियोजन शून्य कारभाराचा आणखी एक नमूना ; सामान्य संगमनेरकरांसह बस प्रवाशांनाही मोठा मनस्ताप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर भर न्यायालयात बूटफेक करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करावा. ही मुख्य मागणी घेवून तालुक्यातील सर्व आंबेडकरी विचारांच्या संघटनांनी आज आंदोलन पुकारले होते. त्यासाठी प्रशासनाची परवानगीही घेतली गेली होती. मात्र त्या उपरांतही पोलिसांना वाहतूकीचे नियोजन करता आले नाही. त्यामुळे शहरातील पुणे नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या सर्व अंतर्गत रस्त्यांवर वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली होती. तब्बल दोनतास चाललेल्या या आंदोलनासाठी पोलिसांनी अतिशय नियोजन शून्य पद्धतीने केवळ ‘बॅरिकेट्स’ लावून रास्तारोको केल्याने घराबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांपासून बाजारात गेलेल्या वृद्धांपर्यंत आणि महिलांपासून महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे बॅरिकेट्स लावलेल्या ठिकाणी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी तोडण्यासाठी कोणतीही व्यवस्था दिसून आली नाही. मात्र शे-दोनशे जणांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या आंदोलनस्थळी मात्र राखीवसह अख्खा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचा परिणाम नविन नगररोडसह काकाजोशी मार्ग, कश्मिरमार्गे अकोलेकडे जाणारा रस्ता अक्षरशः कोंडीत अडकून पडला होता. त्यातही कहर म्हणजे पोलिसांनी विशेषाधिकाराचा वापर करुन महामंडळाचे उत्तरद्वार वाहतूकीसाठी खुले केल्याने दूर पल्ल्याहून आलेल्या आणि नियोजितस्थळी निघालेल्या बसेसच्या वर्दळीमुळे हा संपूर्ण रस्ता बी.एड. कॉलेजपर्यंत तुंबलेला बघायला मिळाला. यातून पोलिसांना ढिसाळपणाही प्रकषनि जाणवला.

मध्यप्रदेशमधील एका संरक्षित वास्तूत असलेली विष्णूची शिल्पाकृती पूर्ववत करावी या मागणीच्या याचिकेवरील सुनावणीत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यातूनच सर्वोच्च न्यायालयातील राकेश किशोर नामक एका वरिष्ठ वकीलाने भर न्यायालयात बूटफेक केली. यावेळी तीन न्यायाधिशांचे खंडपीठ कामकाज पाहत होते. अचानक घडलेल्या या घटनेनंतरही सरन्यायाधीशांनी आरोपीवर कोणतीही कारवाई करण्याचे आदेश न देता त्याला सोडून दिले. मात्र त्यानंतरही आरोपीने आपल्या कृत्यावर कोणताही पश्चताप करण्याऐवजी माध्यमांसमोर येवून आपल्या कृतीचे जाहीर समर्थन केल्याने देशभरात क्षोभही निर्माण झाला.

त्याचाच भाग संतप्त झालेल्या आंबेडकरी विचारांच्या संघटनांकडून या घटनेचा निषेध वर्तवला जात असतानाच मध्यप्रदेशातील अनिल मिश्रा नामक अन्य एका वकिलाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अतिशय वादग्रस्त वक्तव्य केल्याने देशातील आंबेडकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. संगमनेरातही ‘त्या’ घटनेसह ‘त्या’ वक्तव्याचा निषेध म्हणून आंबेडकरी संघटनांनी बसस्थानक चौकात रास्तारोको आंदोलन पुकारले होते. त्यासाठी संघटनांनी पोलिसांकडून परवानगीही घेतली होती. अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरच आंदोलन होणार असल्याची पूर्वकल्पना असल्याने पोलिसांकडून या मार्गाला जोडणाऱ्या शहरांतर्गत रस्त्यांसह महामार्गावरुन वळवलेल्या वाहतूकीचे योग्य नियोजन होण्याची आवश्यकता होती. शिवाय पुणे- नाशिक या दोन महानगरांच्या सुवर्णमध्यात असण्यासह जिल्ह्यातील अतिशय वर्दळीची बाजारपेठ म्हणून लौकिक असल्याने संगमनेर शहर व्यापाराचे केंद्रही आहे. त्यामुळे शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या खासगी वाहनांसह राज्य परिवहन महामंडळाच्या अंतराज्य मार्गावर धावणाऱ्या असंख्य बसेसची संगमनेरात वर्दळ असते. त्यामुळे बसस्थानकावरील आंदोलन हाताळतांना पोलिसांनी अतिशय बारकाईने विचार करुन नियोजन करण्याची आवश्यकता होती. मात्र निष्क्रियतेचा ठपका बसलेल्या शहर पोलिसांकडून यावेळीही संगमेनरकरांच्या अपेक्षा फोलच ठरल्या.

तब्बल दोनतास भर बसस्थानक चौकातच ठिय्या देवून आंदोलक बसल्याने पोलिसांनी हॉटेल कश्मिरसमोर बॅरिकेट्रींग करुन रस्ता अडवला. त्यामुळे महामार्गावरील संपूर्ण वाहने अकोले रस्त्याकडे वळाली. त्यातच बसस्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार आंदोलनामुळे बंद झाल्याने पोलिसांनी आपला विशेषाधिकार वापरून संगमनेर आगाराचे बंद असलेले उत्तरेकडील प्रवेशद्वार खोलण्यास भाग पाडले. त्यामुळे स्थानकात येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसला वाहतूक कोंडींचा सामना करीत अकोले बायपास रस्त्याचा वापर करावा लागला. त्यामुळे हा संपूर्ण रस्ता बी.एड. कॉलेजपर्यंत तुंबलेला बघायला मिळाला. त्याचा परिणाम इंदिरानगर आणि पोलिस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करणाऱ्या उपनगरीय नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

शहराचा लक्ष्मी रस्ता समजला जाणारा नविन नगर रोडही या स्थितीत वेगळा नव्हता. बस स्थानकाकडे येणारा रस्ताच चौथऱ्याजवळ रोखला गेल्याने अनेकांना पर्यायी मार्ग शोधतांना भर उन्हात तब्बल दोनतास खोळंबून बसावे लागले. विशेष म्हणजे शहरातील बहुतेक सर्वच अत्याधुनिक रुग्णालये याच मार्गावर असल्याने दिवसभरात या रस्त्याचा वापर करीत अनेक रुग्णवाहिका रुग्णांची वाहतूक करीत असतात. मात्र त्याचाही कोणताच विचार पोलिसांकडून केला गेल्याचे दिसून आले नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे जून्या आणि नव्या शहराला जोडणारे ‘जंक्शनच’ समजले जाते. या मागनि नवीन नगर रोडसह शाळा व महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या असते. त्याच प्रमाणे उपनगरातील रहिवाशांना मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी हाच मार्ग अतिशय महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळे आंदोलनाच्या कारणाने अस्ताव्यस्थ होणाऱ्या या परिसरातील वाहतूकीचेही बारकाईने नियोजन होण्याची गरज होती. मात्र येथेही पोलिसांचा ढिसाळपणाच दिसून आला. हॉटेल ओंकारेश्वरजवळ थेट महामार्गालाच बॅरिकेटींग करुन गावठाणाकडून बसस्थानकाकडे निघालेल्या नागरिकांना जोशीकाका मार्गाचा पर्याय देण्यात आला.

मात्र, त्याचवेळी कश्मिरजवळून जाणारा अकोले बायपास रस्ताही वाहतूकीने जाम झाल्याने या मार्गावरुन श्रमिक कृषी सेवा केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरही वाहनांची दाटी झाली. त्याचा परिणाम पालिकेच्या नाट्यगृहापासून जून्या तांबे हॉस्पिटल पर्यंत आणि बसस्थानकाकडे येणाऱ्या जोशीमार्गावर तब्बल दिडतास नागरिकांना भर उन्हात अडकून पडावे लागले. प्रत्येकजण डोक्यावरचा घाम पुसत पोलिसांच्या नावाने बोटं मोडीत असल्याचेही चित्र यावेळी दिसून आले. एकंदरीत आंदोलनाची पूर्वकल्पना असतानाही पोलिसांकडून योग्य नियोजन न झाल्याने त्याच्या निष्क्रियतेचा फटका विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत आणि महिलांपासून बस प्रवाशांपर्यंत प्रत्येकाला बसला. त्यामुळे पोलिसांच्या ढिसाळ कारभारांबाबत सामान्य संगमनेरकरांमध्ये चीड निर्माण झाली आहे.

आंदोलन सुरू होताच राज्य वितरण कंपनीने शहराचा वीज पुरवठा खंडीत केला. आधीच ऑक्टोबर हीट मुळे प्रचंड उष्णता सहन करणाऱ्या नागरिकांचाही त्यामुळे रोष वाढला, त्याचा परिणाम वीज कंपनीने जाणीवपूर्वक आंदोलनाची वेळ पाहूनच वीज पुरवठा खंडीत केल्याची चर्चाही आंदोलनस्थळासह घराघरात रंगली होती. विशेष म्हणजे दोनतास चाललेले हे आंदोलन संपल्यानंतर काही वेळातच वीज पुरवठा सुरळीत झाल्याने या चर्चांना एक प्रकारे पाठबळही मिळाले.

 

Visits: 316 Today: 5 Total: 1109447

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *