मुख्यमंत्र्यांच्या सर्वाधीक लाडक्या बहिणी संगमनेरात! जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ; जिल्ह्यात अकरा लाखांहून अधिक लाभार्थी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील महिलांचे सशक्तीकरण व्हावे, त्यांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीला चालना मिळावी, महिलांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन व्हावे, त्यांना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्यासह त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण आहारात सुधारणा करण्याच्या हेतूने राज्य शासनाने अंमलात आणलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला’ राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला असून अहमदनगर जिल्ह्यातील 11 लाख 22 हजार 204 महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात दोन महिन्यांची एकूण तीन हजार रक्कम जमा करण्यात आली असून उशिराने दाखल झालेल्या बहिणींच्या खात्यात एकाचवेळी तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. जिल्ह्यात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला असून संगमनेर तालुक्यातून सर्वाधीक 1 लाख 27 हजार 780 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांना राज्याने मोठा फटका दिला. त्यामागील कारणांची मीमांसा करताना सरकारच्या आर्थिक सुधारणांबाबतच्या धोरणांविषयी मतदारांमधील नाराजी प्रकर्षाने समोर आल्याने राज्य सरकारने सुरुवातीला स्वतःचाच विरोध असलेल्या ‘रेवडी योजनांचा’ अक्षरशः पाऊस पाडायला सुरुवात केली. त्यातून महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या नावाखाली राज्यातील 50 टक्के मतदार असलेल्या महिलांवर लक्ष केंद्रीत करताना शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सुरु केली. वार्षिक अडिच लाखांहून कमी उत्पन्न असलेल्या 21 ते 65 या वयोगटातील राज्यातील कोणत्याही महिलेला या योजनेत सहभागी होण्याची शिथीलताही सरकारने आणली, त्यासाठी जाचक ठरणार्या उत्पन्नाच्या दाखल्याची अटही सोडून देण्यात आल्याने या योजनेत सहभागासाठी महिलांची अक्षरशः झुंबड उडत आहे.
या योजनेत सहभागी होवू इच्छिणार्या महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचण असल्यास त्यांना अंगणवाडीत जावून तेथील सेविकांमार्फत मोफत अर्ज भरण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी आधारकार्ड, मोबाईल क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँकेचे पासबुक, वय व रहिवासाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला अथवा शाळा सोडल्याचा दाखला, पिवळ्या अथवा केशरी शिधापत्रिकेची सत्यप्रत, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि योजनेच्या अटी व शर्तींचे पालन करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याने शासनाने पूर्वीच्या 31 ऑगस्ट या अंतिम तारखेत बदल करुन आता 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुभा दिली आहे.
जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. आत्तापर्यंत या योजनेत जिल्ह्यातून 11 लाख 22 हजार 204 महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. त्यात सर्वाधीक 1 लाख 27 हजार 780 अर्ज एकट्या संगमनेर तालुक्यातून प्राप्त झाले असून त्या खालोखाल अहमदनगर तालुका 1 लाख 20 हजार 965, राहाता 1 लाख 12 हजार 842, नेवासा 91 हजार 550, राहुरी 84 हजार 198, श्रीगोंदा 76 हजार 489, अकोले 74 हजार 656, कोपरगाव 73 हजार 755, श्रीरामपूर 71 हजार 938, पारनेर 67 हजार 692, पाथर्डी 61 हजार 519, कर्जत 59 हजार 220, शेवगाव 58 हजार 818 व सर्वात कमी जामखेड तालुक्यातून 40 हजार 782 लाडक्या बहिणींचे अर्ज दाखल झाले आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलेला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा’ लाभ मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सप्टेंबर महिन्यातही या योजनेतंर्गत नोंदणी सुरु राहणार असून जिल्ह्यातील 21 ते 65 वयोटातील महिलांनी आपले बँकखाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे. योजनेत सहभागासाठी ऑनलाईन शिवाय आवश्यक कागदपत्रांसह अंगणवाडीत जावूनही अर्ज दाखल करता येतील या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा.
सिद्धाराम सालीमठ
जिल्हाधिकारी, अहमदनगर
संसाराचा गाडा ओढताना अनेकदा आपल्या व्यक्तिगत इच्छांना मुरड घालावी लागते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतंर्गत प्रतिमाह दीड हजारांची रक्कम मिळणार असल्याने मला आता कौशल्यावर आधारित विषयाचे प्रशिक्षण घेता येईल. त्यातुन एखादा छोटासा व्यवसाय सुरु करुन पतीच्या परिश्रमांना हातभार लावता येईल.
प्रिया सत्रे, योजनेच्या लाभार्थी