जयहिंद पत्रिका सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी नवविचारांची क्रांती ठरणार ः आ. डॉ. तांबे जगभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत जयहिंद पत्रिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सुदृढ व निरोगी समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जयहिंद लोकचळवळीची जयहिंद पत्रिका नवविचारांच्या क्रांतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला.

जयहिंद पत्रिकेच्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते तर व्यासपीठावर नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सत्यजीत तांबे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले, चांगल्या समाज निर्मितीसाठी सर्वांनी जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून एकत्र यावे. ही एक सेवाभावी संस्था असून सुदृढ व निरोगी समाजनिर्मितीसाठी लोकचळवळ आहे. यामध्ये सर्व प्रवाहातील स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन चांगल्या समाजनिर्मितीचे स्वप्न घेऊन काम करायचे आहे. आपली लोकशाही ही समाजाच्या हिताची आहे. त्या मार्गाने काम करण्यासाठी युवावर्ग, समाजातील सर्व घटक यांना एकत्र करून लोकशाहीची मूल्ये जपत कार्य करायचे आहे. जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून मागील 22 वर्षात सांस्कृतिक युवा क्रीडा स्पर्धांसह, पर्यावरण, आरोग्य, संस्कार, विज्ञानवादी दृष्टीकोन, स्वच्छता अभियान, नोकरी मेळावे यावर काम केले जात आहे. मागील दोन वर्षांपासून ग्लोबल कॉन्फरन्सच्या माध्यमातून जगातील 28 देशांमध्ये या चळवळीचे काम पोहोचले असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान डॉ. सूरज गवांदे (अमेरिका), डॉ. किशोर गोरे, राजेंद्र गाडे, राजेंद्र डिचपल्ली गांधीयन सोसायटी (न्यूयॉर्क), अमिरेझा समरबक्ष (इराण), उत्कर्षा रुपवते (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रवक्त्या), बालाजी पवार व इयत्ता सहावीतील वृंदाविनी यांनी आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात निरोगी व सुदृढ समाजनिर्मितीसाठी सर्वांनी एकत्र येण्याची आजच्या घडीला कशी गरज आहे यावर भर देत, जयहिंद पत्रिका हे काम अतिशय प्रभावीपणे पूर्ण होईल असा विश्वास सर्वांनी एकसुरात दाखविला. कार्यक्रमाच्या शेवटी जयहिंद लोकचळवळीचे प्रमुख समन्वयक संकेत मुनोत यांनी जयहिंद पत्रिका प्रकाशनाचा समारंभ हा ऐतिहासिक क्षण आहे व ही पत्रिका सुदृढ समाजनिर्मितीसाठी युवावर्गाला व्यासपीठ निर्माण करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *