कोविडने घेतला संगमनेर शहरातील आणखी एकाचा बळी! आजी नगरसेवकाच्या माजी नगरसेवक पत्नीसह माजी नगरसेवकाच्या पत्नीलाही कोविडची लागण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नियंत्रणात आलाऽआला म्हणता अहमदनगर जिल्ह्यातील कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा भरात आला आहे. नववर्षात लसीकरणाला सुरुवात झाल्याने आणि त्यातच कोविड रुग्णांची संख्या खालावत गेल्याने नागरिकांनी नियमांची एैशीतैशी केली, त्याचा परिणाम आता ठळकपणे समोर येवू लागला असून शहरातील रुग्णालये पुन्हा तुडूंब होवू लागली आहेत. गेल्या महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीतील रुग्णवाढीचा वेगही अधिक असून आत्तापर्यंत 332 रुग्णांची भर पडली असून बुधवारी कोविडने या महिन्यातील तिसरा बळीही घेतला आहे. त्यासोबतच बुधवारी नववर्षात उच्चांकी ठरणारी रुग्णसंख्या समोर आल्याने तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या आता 6 हजार 647 वर जावून पोहोचली आहे.

नोव्हेंबरनंतर देशात कोविडची दुसरी लाट येणार असल्याचे अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी वर्तविले होते. प्रत्यक्षात मात्र डिसेंबरमध्ये कोविड संक्रमणाची सरासरी खालावत गेली. त्यातच पुणे आणि हैद्राबाद येथील औषध निर्माण करणार्या कंपन्यांनी लस तयार झाल्याची आनंदवार्ता दिल्याने सामान्य नागरिकांनी कोविडचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्याप्रमाणे नियमांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. मात्र तो पर्यंत सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या कार्यक्रमांवर मर्यादा कायम असल्याने ठराविक कालावधीपर्यंत कोविडचा उद्रेक थोपला गेला. त्यातच जानेवारीत राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्याने जवळपास 20 दिवस कोविड नियमांना अक्षरशः तिलांजली वाहण्यात आली. यासर्व घडामोडींचे दुष्परिणाम फेब्रुवारीत अगदी ठळकपणे समोर येवू लागले असून चालू महिन्याने जानेवारीच्या एकूण रुग्णसंख्येला बरेच मागे टाकले आहे.

कोविडचे संक्रमण होवूनही त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने बुधवारी शहरातील एका कोविड रुग्णाला आपला जीव गमवावा लागला. फेब्रुवारीत नोंदविला गेलेला हा तिसरा कोविड मृत्यू होता. त्यासोबतच बुधवारी संगमनेरात जिल्ह्यातील दुसर्या क्रमांकाची रुग्णसंख्या समोर आली आहे. काल जिल्ह्यात एकूण 129 रुग्ण आढळून आले, त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रात सर्वाधीक 35 तर त्या खालोखाल संगमनेरात 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्याखालची थेट 9 ही रुग्णसंख्या कोपरगाव तालुक्यात नोंदविली गेली. यावरुन कोविडच्या संक्रमणात अहमदनगर नंतर संगमनेर तालुकाच आघाडीवर असल्याचेही स्पष्ट झाले.

बुधवारी (ता.24) आढळून आलेल्या एकूण 31 रुग्णांमध्ये शहरातील 17 तर ग्रामीणभागातील 14 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या 1 हजार 838 तर ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 4 हजार 769 झाली आहे. कालच्या अहवालातून शहरातील अभिनवनगर परिसरातील 52 वर्षीय महिला, जाणता राजा मैदानाजवळील 9 वर्षीय बालकासह चार वर्षीय बालिका, गणेशनगरमधील 45 व 25 वर्षीय महिला, देवी गल्लीतील 43 वर्षीय तरुण, जय प्रकाश रस्त्यावरील बालिका, मालदाड रोडवरील 58 वर्षीय इसम, वडजेमळा भागातील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, घोडेकर मळ्यातील 71 वर्षीय महिला, सुतार गल्लीतील 53 वर्षीय महिला, पाटील चावडी जवळील 65 वर्षीय महिलेसह 36 वर्षीय तरुण, साईबाबा वसाहतीमधील 45 वर्षीय इसम, सावतामाळी नगरमधील 36 वर्षीय तरुण.

ग्रामीण भागातील निमज येथील 15 वर्षीय बालिका, श्रमिक मंगल कार्यालयाजवळील 54 वर्षीय महिलेसह गुंजाळवाडी शिवारातील 42 व 32 वर्षीय तरुण, पिंपळगाव येथील एक वर्षीय बालिका, सायखिंडी येथील 53 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 52 वर्षीय इसम, कौठे बु. येथील 49 वर्षीय इसम, निमोण येथील 33 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 33 वर्षीय महिला, धांदरफळ येथील 58 वर्षीय इसम व गणेशमळा येथील 50 वर्षीय महिला, कोळवाडे येथील 39 वर्षीय तरुण आणि कनोली येथील 26 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी आढळून आलेली एकूण रुग्णसंख्या गेल्या दोन महिन्यातील सर्वोच्च असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील आत्तापर्यंतच्या बाधितांची संख्या आता 6 हजार 647 झाली असून मृतांची संख्याही 53 वर पोहोचली आहे. आजच्या स्थितीत तालुक्यातील 157 रुग्ण सक्रीय संक्रमित असून आजवर 6 हजार 438 रुग्णांनी उपचार पूर्ण केले आहेत.

जिल्ह्यातील कोविडच्या संक्रमणाला पुन्हा एकदा गती प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी जिल्ह्यात 129 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यात अहमदनगर 36, संगमनेर 31, राहुरी व इतर जिल्ह्यातील प्रत्येकी 7, राहाता 10, कोपरगाव 9, अकोले व पाथर्डी येथील प्रत्येकी 5, नगर ग्रामीण, पारनेर व श्रीगोंदा येथे प्रत्येकी चार, कर्जत येथे ती, श्रीरामपूर येथे दोन तर नेवासा व शेवगाव येथे प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 74 हजार 973 वर पोहोचली असून आजवर 72 हजार 943 रुग्णांनी उपचार पूर्ण केले असून 898 जणांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत 1 हजार 132 कोविड बाधितांचा मृत्यू झाला आहे.

