‘एसएमबीटी’च्या फार्मसी महाविद्यालयात घडताहेत भविष्यातील संशोधक पाच वर्षात शंभराहून अधिक संशोधन; विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचाही विकास

नायक वृत्तसेवा, संगमनेर
औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांसमोर मेडिकल व्यवसाय सुरू करणे, औषधांची निर्मिती करणार्‍या कंपन्यांकरिता प्रतिनिधी म्हणून काम करणे हे पर्याय उपलब्ध असतात. मात्र, औषधनिर्माणशास्त्रचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना संशोधक होण्यास वाव आहे. त्याच दृष्टीने विद्यार्थी घडविण्याचे काम एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी आणि इन्सिट्यूट ऑफ डी. फार्मसीमध्ये होत आहे. गत पाच वर्षात या कॉलेजमधील शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी यशस्वी संशोधन केले असून येथे भविष्यातील संशोधक घडत आहेत.

नंदीहिल्स धामणगाव-घोटी खुर्द (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथे 17 वर्षांपूर्वी एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेज सुरू झाले. औषधनिर्माणशास्त्रचे पदवी आणि पदविका असे दोन्ही अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास, खेळ, मेस, होस्टेल, संशोधन कॅम्पस इंटरव्ह्यू आदिंना देखील महत्व दिले जाते. येथील परिसर पर्यावरणपूरक असल्याने देखील या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याकरीता राज्यभरातील विद्यार्थ्यांची पसंती असते.

औषधनिर्माणशास्त्राचे महत्व अनन्यसाधारण आहे. कोरोनाच्या संकटानंतर औषधनिर्माणशास्त्र शाखेत संशोधनासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना विद्यार्थ्यांना संशोधनात रुची निर्माण व्हावी, त्यांचा संशोधनात सहभाग असावा. या हेतून 2018 पासून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहित करत त्या संदर्भात विशेष मार्गदर्शन सुरू केले. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. पाच वर्षात तब्बल शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी औषधनिर्माणशास्त्राशी निगडित बाबींवर संशोधन पूर्ण केले असून इतरही विद्यार्थी सध्या संशोधन करीत आहेत. स्वतंत्र प्रयोगशाळा, वाचनालय आहे. वाचनालयात भरीव ग्रंथसंपदा आहे त्यांचा लाभ विद्यार्थ्यांना होतो. विद्यार्थ्यांचा गुणवत्तेसोबतच संशोधन देखील तितकेच महत्वपूर्ण असल्याने महाविद्यालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय परिषद, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दौरे याचे नेहमीच आयोजन करण्यात येते. नेपाळ, इंडोनेशिया, थायलंड आदी देशांमधील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक दौरे आयोजित करण्यात येतात. तसेच इतरही देशांमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत या महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होतात.

एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. योगेश उशीर यांनी संशोधनात केलेल्या कार्याबद्दल त्यांना आयटूओआर अकॅडमीच्यावतीने दिला जाणार्‍या यंग रिसर्च अवॉर्ड तसेच रेड टॉक्स इंटरनॅशनलच्यावतीने दिल्या जाणार्‍या आयकॉनिक प्रोफेसर अवॉर्ड यासह इतरही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. इंडोनेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रा. किरण सूर्यवंशी यांना बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले असून इतरही प्राध्यापकांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.

विशेष शैक्षणिक करार..
थायलंड, नेपाळ, इंडोनेशिया, मलेशिया, घाणा या देशांतील प्रमुख विद्यापीठांशी एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी आणि इन्सिट्यूट ऑफ डी. फार्मसीचा 2018 पासून विशेष शैक्षणिक करार झाला आहे. या देशांतील संशोधकांचे संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात येते. याचा लाभ विद्यार्थ्यांना देखील होतो.

Visits: 42 Today: 1 Total: 395189

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *