मराठा समाजाची मी दिलगिरी व्यक्त करतो ः पांडे अकोलेत ओबीसी संघटनेची पत्रकार परिषद

नायक वृत्तसेवा, अकोले
सरकारने कुणबी समाजातील कुटुंबांचा सर्व्हे करताना जे प्रश्न विचारण्यात येत आहेत, त्याच प्रश्नांवर जी उत्तरे अपेक्षित आहेत, त्याबद्दल सोशल मीडियावर जी प्रश्न व उत्तरे व्हायरल करण्यात आले, त्यावर मी वक्तव्य केले. मी महिला किंवा जातीधर्मात तेढ निर्माण होईल असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मी सर्व जातीधर्मातील लोकांचा व महिलांचा आदर करणारा कार्यकर्ता आहे. तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्यावर एकेरी वक्तव्य केल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो व माझ्या वक्तव्यावरून कोणाच्या भावना दुखावण्याचा व अनादर करण्याचा प्रयत्न मी केलेला नाही. अपशब्द वापरले नाहीत व यापुढील काळातही माझ्याकडून असे होणार नाही तरी माझ्या वक्तव्याने जर मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि शनिवारी (ता.३) नगर येथील ओबीसी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ओबीसी नेते मीनानाथ पांडे यांनी केले.

मीनानाथ पांडे यांच्या वक्तव्याच्या निषेधाची सकल मराठा समाजाची पत्रकार परिषद झाल्यानंतर मंगळवारी (ता.३०) मीनानाथ पांडे यांच्या समर्थनार्थ व गैरसमज दूर करण्यासाठी तालुका ओबीसी संघटनेची पत्रकार परिषद शासकीय विश्रामगृहावर पार पडली. यावेळी ओबीसींचे ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे हे वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करत बोलत होते. याप्रसंगी माळी समाजाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब मंडलिक, बाळासाहेब ताजणे, माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक, प्रा. बाळासाहेब मेहेत्रे, अशोक गायकवाड, किसन बेणके, नितीन बेणके, शिवाजी गायकवाड, बाळासाहेब वाकचौरे, नवनाथ गायकवाड, सचिन ताजणे, विष्णू कर्णिक, अशोक झोडगे, राजेंद्र उकिरडे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना मीनानाथ पांडे म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आज अचानक उद्भवलेला नाही. मराठा आरक्षणावर अनेक मूकमोर्चे निघालेत. मराठा समाजात दारिद्य्राखालील अनेक कुटुंब आहेत. अकोले तालुक्यातून अनेक मराठा समाजाला कुणबीचे दाखले मिळवून देण्यात आम्हीही प्रशासकीय अधिकार्यांकडे आग्रह धरून ते मिळवून दिले आहेत. पण सरसकट सर्वांनाच ते देण्याचा वटहुकूम शासनाकडून काढण्यात आल्याची बाब ओबीसींवर अन्यायकारक आहे. बाराबलुतेदार लोकांपैकी अनेकांना शेती नाही. उदरनिर्वाहासाठी त्यांचे त्यांचे व्यवसाय आहेत. अकोले तालुक्यातून ओबीसींचे लोक मोठ्या संख्येने अहमदनगर येथील तीन फेब्रुवारीच्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहोत. सर्वांनाच एकत्रित प्रेमाणे राहायचे आहे. आपण मराठा व ओबीसींचे प्रश्न मार्गी लागण्यास हातभार लावू. मला वातावरण तणावपूर्ण करायचे नाही व सर्वांनी शांततेत आंदोलन करावे. १६ फेब्रुवारीपर्यंत ओबीसींच्या हरकती दाखल करण्यास सुरुवात होणार असून हम सब ओबीसी म्हणून ३ फेब्रुवारीच्या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहनही पांडे यांनी केले. समता परिषदेचे नेते भाऊसाहेब मंडलिक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गणेश ताजणे यांनी प्रास्ताविक केले तर आभार ओबीसी नेते बाळासाहेब ताजणे यांनी मानले.

ज्याने मला फोनवर शिवीगाळ केली त्याचा निषेध मी व्यक्त करतो. मात्र त्याच्यावर कोणतीही पोलीस केस करणार नाही, त्याच्यावर सरकार काय कारवाई करील ते करील असे स्पष्ट करीत त्याने मला शिव्या दिल्या असत्या तर हरकत नव्हती. परंतु माझे हयात नसलेल्या आईवडिलांना शिव्या दिल्या. असे म्हणताना ते भावुक झाले होते. या शिव्या देणार्या तरुणावर कारवाई करणार आहेत की नाही. त्याचा निषेध तुम्ही करणार की नाही असा सवाल मीनानाथ पांडे यांनी सकल मराठा समाजाच्या नेत्यांना केला. तसेच मला या वयात कोणताही आजार नाही. माझी तब्येत ठणठणीत आहे. माझे मानसिक संतुलन चांगले आहे याची टीका करणार्यांनी नोंद घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
