रणखांब शिवारात कारच्या धडकेत मजुराचा मृत्यू! घारगाव पोलिसांत कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील रणखांब शिवारातील रणखांब ते कौठे मलकापूर रस्त्यावर कारने एका मजुरास जोराची धडक दिली. यामध्ये मजूर जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता.19) पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, भगवान सदाशिव चौकल्ले (वय 55, रा.ता.लोहा, जि.नांदेड) हे बोअरवेलच्या गाडीवर मजूर म्हणून काम करत होते. शुक्रवारी पहाटे संगमनेर येथून बोअरवेलची गाडी साकूर फाटा मार्गे रणखांबकडे जात होती. दरम्यान, ही गाडी रणखांब ते कौठे मलकापूर रस्त्यावर आली असता काही कारणास्तव रस्त्याच्या कडेला थांबली. त्यावेळी मजूर भगवान चौकल्ले हे गाडीच्या खाली उतरुन लघुशंका करण्यासाठी रस्त्याच्या कडेला गेले. त्याचवेळी नियतीने घाला घातल्याने भरधाव वेगाने आलेल्या कारने (क्रमांक एमएच.17, एजे.3481) मजूर चौकल्ले यांना जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने ते जागीच गतप्राण झाले.

या प्रकरणी मनमथ बाबुराव वड्डे (रा.देवणीवाडी, ता.लोहा, जि.नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक 65/2021 भादंवि कलम 304 (अ), 279, मो.वा.का.क. 184, 134 (अ) (ब), 177 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश टकले हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *