अरे व्वा! वाहनांचे अलिशान दालन फोडणारी टोळी पकडली! संगमनेरातील शान व हृयुंदईच्या दालनांसह अकोल्यातील मोबाईल शॉपी फोडणारे झाले गजाआड..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सायखिंडी शिवारातील शान मोटर्ससह नगर रस्त्यावरील ह्युंदई कंपनीच्या चारचाकी वाहनांचे दालन फोडून रोखपालाच्या कक्षातील कपाटातून सुमारे साडेचार लाखांची रोकड लांबवणार्या टोळीचा संगमनेर शहर पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात सिन्नर तालुक्यातील तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून या सराईत टोळीकडून शहरातील अन्यकाही गुन्ह्यांसह अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दितील मोबाईल शॉपीचा गुन्हाही उघड झाला आहे. या तिघांकडून 1 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सध्या तिघेही संशयित पोलीस कोठडीत आहेत. अवघ्या विस दिवसांतच पोलिसांनी तीन मोठे गुन्हे उघड केल्याने संगमनेर पोलिसांचे कौतुक होत आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2 फेब्रुवारी रोजी नाशिक रस्त्यावरील हरिबाबा मंदिराजवळील शान मोटर्सचे दालन फोडून चोरट्यांनी 1 लाख 20 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणाचा तपा सुरु असतांनाच 16 फेब्रुवारी रोजी पहाटे नगर रस्त्यावरील ह्युंदई वाहनांचे दालनही चोरट्यांनी फोडले व तेथील रोखापालच्या कक्षातील कपाट उचकटून त्यातील सुमारे 3 लाख 20 हजारांची रोकड घेवून पोबारा केला. सदर प्रकरणाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निकिता महाले यांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला.

दोन्ही ठिकाणची दालने फोडतांना चोरट्यांनी एकाच प्रकारची औजारे वापरल्याचे निरीक्षण तपासी अधिकारी महाले यांनी नोंदवित हे काम एकाच टोळीचे असल्याचा निष्कर्ष काढला. त्याच दिशेने तपास सुरु असतांना नाशिक जिल्ह्यात आधी झालेल्या अशाच घटनांची माहिती मिळवित त्यांनी तपासाची दिशा सिन्नरमधील एका सराईत टोळीकडे वळविली. त्यांचे मोबाईल क्रमांक मिळवून घटनेच्या दिवशीचे त्यांचे ‘लोकेशन’ पाहता त्यांचा संशय विश्वासात बदलला. त्यानुसार वरीष्ठ अधिकार्यांसह शहर पोलिसांच्या पथकाने सिन्नर पोलिसांच्या मदतीने शिवडे (ता.सिन्नर) येथे छापा घालीत विजय सुदाम कातोरे (वय 20), सोमनाथ निवृत्ती मेंगाळ (वय 21) व विजय सखाराम गिर्हे (वय 20, तिघेही रा.शिवडे. ता.सिन्नर) यांना ताब्यात घेतले.

संगमनेरला आणून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी 2 फेब्रुवारी रोजी सायखिंडी शिवारातील शान मोटर्सचे दालन फोडल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांना सदरच्या गुन्ह्यात अटक करुन त्यांची कोठडी मिळविण्यात आली. कोठडीतील अधिक चौकशीत त्यांनी 16 फेब्रुवारी रोजी नगर रस्त्यावरील ह्युंदई कंपनीच्या चारचाकी वाहनांचे दालन फोडल्याचेही मान्य केले. त्यासोबतच अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दितील मोबाईल शॉपी फोडून त्यातील 2 लाख 54 हजार रुपयांचे मोबाईल चोरल्याचीही कबुली त्यांनी चौकशी दरम्यान दिली.

संगमनेर शहर पोलिसांनी त्यांच्याकडून 1 लाख 80 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्यात त्यात बजाज कंपनीची मोटार सायकल, अकोल्यातून चोरलेले सात मोबाईल व रोख रकमेचा समावेश आहे. या प्रकरणाच्या तपास पथकात स.पो.नि.निकिता महाले यांच्यासह सहाय्यक फौजदार राजू गायकवाड, पो.ना.विजय खाडे, पो.कॉ.अमृत आढाव, प्रमोद गाडेकर, शरद पवार, सचिन उगले, सुभाष बोडखे, श्रीरामपुरचे पो.कॉ. फुरकान शेख व अकोल्याचे पो.कॉ.गणेश शिंदे यांचा समावेश होता.

गेल्या काही वर्षांपासून संगमनेर तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दित घडलेल्या असंख्य गुन्ह्यांचे तपास अद्यापही लागलेले नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर वारंवार टीका झाल्या आहेत. संगमनेर शहर पोलिसांनी मात्र अत्यंत चिकाटीने चालू वर्षात घडलेल्या सर्वच गुन्ह्यांचा गांभिर्याने तपास केल्याने एकाच सराईत टोळीकडून तब्बल सात लाख रुपयांच्या चोरीचे तीन गुन्हे उघड केल्याने पोलिसांवर लागलेला निष्क्रियतेचा डाग पुसण्यास मोठी मदत झाली आहे. शहर पोलिसांनी पार पाडलेल्या या कामगिरीबद्दल शहरातून समाधान व्यक्त होत असून पोलिसांचे कौतुकही केले जात आहे.

