वीरगावमध्ये भाजपचे घंटानाद आंदोलन
वीरगावमध्ये भाजपचे घंटानाद आंदोलन
नायक वृत्तसेवा, अकोले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली होती. परंतु भाजपच्या अध्यात्मिक आघाडीच्यावतीने आज (शनिवार ता.29) राज्यातील सर्व प्रमुख मंदिरांपुढे ‘दार उघड उद्धवा दार उघड’ हे घंटानाद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार अकोले तालुक्यातील वीरगाव येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हनुमान मंदीर व विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले.

दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने अनेक नियम लागू केले आहेत. तर दुसरीकडे मिशन बिगीन अगेनमध्ये शिथीलता देत आहेत. परंतु अद्यापही धार्मिक स्थळे बंद आहेत. यासाठी ती लवकरात लवकर सुरू करावीत या मागणीसाठी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीच्यावतीने घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे. वीरगावमध्ये झालेल्या आंदोलनात जिल्हा परिषदेचे भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे, युवा मोर्चाचे वाल्मिक देशमुख, बाबासाहेब वाकचौरे, नामदेव कुमकर, संपत भोर, रामनाथ टेमगिरे, नीलेश वाकचौरे, विकास शिंदे, पोपट शिंदे, संदीप अस्वले, लक्ष्मण नजान, विलास नजान आदीग्रामस्थ उपस्थित होते.

