संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णवाढीला स्थानिक उपचार ठरताहेत कारणीभूत! गेल्या पाच दिवसांत शहरी रुग्णगतीत झाली घट; मात्र, ग्रामीण रुग्णवाढीची गती तिपटीने वाढली..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या दीड महिन्यापासून टप्प्याटप्प्याने जिल्ह्याला संक्रमणाच्या दरीत नेणार्‍या कोविडने संगमनेर तालुक्यातही अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र मागील तेरा दिवसांच्या अहवालांचे विश्लेषण केल्यास त्यातून अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर आली असून त्याला वरीष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांनीही दुजोरा दिला आहे. गेल्या पंधरवड्यात शहरी रुग्णसंख्येला लागलेली ओहोटी आणि त्याचवेळी ग्रामीण रुग्णसंख्येतील भरमसाठ वाढ अत्यंत चिंताजनक असून स्थानिक पातळीवर गावाकडेच होणारे उपचार त्याला कारणीभूत असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष त्यातू समोर आला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी याचा गांभिर्याने विचार करुनच आपल्या कुटुंबातील बाधित व्यक्तिवर उपचार करण्याची गरज आहे.


सध्या जिल्ह्यातील सरासरी संक्रमणाचा दर 1 हजार 984 रुग्ण दररोज असा असून संगमनेर तालुक्यातील सरासरी 141 रुग्ण दररोज इतक्या मोठ्या प्रमाणात उंचावली आहे. यापूर्वीच्या संक्रमणात शहर आणि ग्रामीणभाग यातील दैनिक आकडेवारीत फार मोठी तफावत असल्याचे अपवादानेच आढळत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या सूत्रात बदल होवून शहरी रुग्णसंख्येला आहोटी तर ग्रामीण रुग्णसंख्येला भरती आल्यासारखे चित्र दिसत आहे. त्यातच ग्रामीणभागातून शहरातील रुग्णालयात दाखल होणारे बहुतेक रुग्ण गंभीर स्वरुपातच आणले जात असल्याने एकतर अशा अवस्थेतील रुग्णांसाठी आवश्यक सुविधा असलेल्या खाटा उपलब्ध होत नाहीत अथवा वैद्यकीय यंत्रणेसह रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ होतांना दिसत आहे.

एप्रिल महिन्यातील पहिल्या आठ दिवसांत तालुक्यात सरासरी 138 रुग्णगतीने एकूण 1 हजार 102 रुग्ण आढळून आले. त्यात शहरी रुग्णांची संख्या 271 (सरासरी 34) व ग्रामीण क्षेत्रातील रुग्णांची संख्या 831 (सरासरी 104) होती. मात्र त्यानंतरच्या पाच दिवसांत सरासरी 146.4 रुग्ण दररोज या वेगाने तालुक्यात तब्बल 732 रुग्णांची भर पडली आहे. या पाच दिवसांत तालुक्यातील रुग्णवाढीची गती तब्बल 8.4 ने वाढल्याचे दिसत असून त्यात शहरी रुग्णसंख्येत सरासरी 24 रुग्ण दररोज या गतीने 119 तर ग्रामीण क्षेत्रात सरासरी 122.6 रुग्ण दररोज या गतीले तब्बल 613 बाधितांची भर पडली आहे. एकाच महिन्यातील दोन टप्प्याच्या विश्लेषणातून गेल्या पाच दिवसांत शहरातील रुग्णसंख्या पहिल्या आठ दिवसांच्या तुलनेत नंतरच्या पाच दिवसांत तब्बल सरासरी 10 टक्क्याने खालावली, तर ग्रामीण क्षेत्रातील रुग्णसंख्या सरासरी 104 वरुन 18.6 टक्क्याने वाढून 122.6 झाल्याचे दिसून येते.

शहरीभागातील रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या आणि तत्काळ मिळणार्‍या आरोग्य सुविधा, रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांचा योग्य ठिकाणी उपचार घेण्याचा निर्णय यामुळे शहरी रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाणही खूप कमी झाले असून तुलनेत ग्रामीणभागातील रुग्णगतीसह कोविड मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याबाबत कोविडच्या उपचारांमध्ये गेल्यावर्षी सुरुवातीपासून असलेल्या आणि मोठा अनुभव प्राप्त केलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांशी याबाबत चर्चा केली असता त्यातून धक्कादायक वास्तव समोर आले असून स्थानिक पातळीवरील उपचारांमुळे रुग्णांची संख्या वाढण्यासह मृत्यूची सरासरीही उंचावत असल्याचे सत्य समोर आले आहे. त्यामुळे ग्रामीणभागातील रुग्णांनी याबाबत अधिक सजग राहूनच उपचारांची जागा ठरविणे आता क्रमप्राप्त असल्याचे समोर आले आहे.

कोविडबाबतची मानसिक भीती, कोविडचा संसर्ग झाला नसल्याचा चाचणीपूर्व स्वअंदाज आणि लक्षणे आढळूनही कोविड तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ग्रामीणभागात स्थानिक पातळीवरच उपचार घेण्यामुळे ग्रामीणभागात संक्रमणासह मृत्यूचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण क्षेत्रातून संगमनेरात दाखल होणार्‍या अशा अनेक रुग्णांचे दाखले समोर आले असून शून्य स्कोअर असताना स्थानिक पातळीवरील डॉक्टरांकडे चार/पाच दिवस उपचार घेणार्‍यांचा स्कोअर थेट 8 ते 10 तर सहा/सात दिवस उपचार घेणार्‍यांचा स्कोअर थेट 14 ते 18 च्या दरम्यान गेलेल्या अवस्थेत त्यांना दाखल केले जात असल्याचे समोर आले आहे. निदानाशिवाय स्थानिक उपचार घेण्यात वेळ घालवल्यामुळे अशा अनेक रुग्णांची अवस्था गंभीर होत असून अशा स्थितीत त्यांना तत्काळ ऑक्सिजन अथवा आवश्यक सुविधेच्या खाटा उपलब्ध होत नसल्याचेही समोर आले आहे.

या वस्तुस्थितीमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक धावपळ करावी लागते आणि एवढे करुनही एखाद्या ठिकाणी खाट उपलब्ध झाली तरीही रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर पातळीवर गेलेली असल्याने त्याला वाचवणे अवघड होवून जात आहे. संगमनेर शहरासह प्रशासनाने त्यासाठी ग्रामीणभागातील काही ठिकाणी कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु केले आहेत. लक्षणे असलेल्या अथवा नसलेल्या दोन्ही प्रकारच्या रुग्णांना कोविडच्या उपचारांसाठी सज्ज असलेल्या ठिकाणीच दाखल करणे अत्यंत आवश्यक असून तेथेच संबंधित रुग्णाला कोविड विषयक योग्य उपचार मिळू शकतात असे वरीष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांचे ठाम मत आहे. संगमनेर तालुक्यातील नागरिकांनी या वृत्ताचा गांभीर्याने विचार करुन अधिक काळजी घेण्याची व योग्य निर्णय घेवून आपल्या कुटुंबातील रुग्णाला योग्य ठिकाणीच उपचार देण्याची गरज आहे, अन्यथा ग्रामीण संक्रमणाला आलेला वेग असाच वाढत राहण्याचीही भीती निर्माण झाली आहे.

एप्रिलच्या पहिल्या दिवसापासूनच संगमनेर तालुक्यातील रुग्णगतीने वेग घेतला आहे. मात्र यावेळच्या दुसर्‍या संक्रमणात शहरी भागापेक्षा ग्रामीण क्षेत्राला अधिक फटका बसत असल्याचे दिसत आहे. गेल्या तेरा दिवसांचा विचार करता संपूर्ण संगमनेर तालुक्यात सरासरी 141 रुग्णगतीने 1 हजार 834 रुग्णांची भर पडली आहे. यात शहरातील रुग्णसंख्या अवघी 390 (सरासरी 30) व ग्रामीण भागातील रुग्णसंख्या तब्बल 1 हजार 444 (सरासरी 111) इतकी प्रचंड आहे. यावरुन ग्रामीण भागातील संक्रमण किती गतीमान आहे याचा अंदाज लावता येतो. नागरिकांनी स्थानिक पातळीवरील उपचारांमध्ये वेळ न घालवता कोविड संबंधी उपचारांची व्यवस्था असलेल्या केंद्रामध्येच दाखल व्हावे असेच हे विश्लेषण सांगत आहे.

Visits: 96 Today: 3 Total: 1102347

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *