वारंवार कारवाया होवूनही संगमनेरातील गुटखा विक्री सुरुच! शुक्रवारी अलिशान वाहनातून गुटखा तस्करी करणार्या तिघांवर कारवाई

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गुटखा आणि त्यावर होणार्या सातत्याच्या कारवाया असे सूत्र गेल्या काही महिन्यांपासून दिसत असले तरीही त्यातून या बेकायदा मात्र राजरोस व्यवसायावर कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. आतातर गोवंश मांसाच्या तस्करीप्रमाणे गुटखा तस्करीतही अलिशान वाहनांचा वापर होवू लागल्याचे शुक्रवारी संगमनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले. विशेष म्हणजे गेल्या महिन्यापासून पोलिसांनी गुटखा तस्करीत सापडणार्यांविरोधात तब्बल दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा असलेले भा.दं.वि. कलम 328 सह गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र गुटखा तस्करांना त्याचाही धाक वाटत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. शुक्रवारी पोलिसांनी सायखिंडी फाट्याजवळ केलेल्या कारवाईत सहा लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार शिवजयंतीच्या दिनी शुक्रवारी (ता.19) सायखिंडी फाट्यावर कोळपेवाडी (ता.कोपरगाव) येथील एक व्यापारी गुटखा पोहोचवणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना समजली होती, त्यानुसार त्यांनी परिसरात सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीनुसारच्या वर्णनाचे वाहन आणि व्यक्तीतेथे पोहोचताच पोलिसांनी छापा घालीत वाहनासह तिघांना जागीच जेरबंद केले.

या कारवाईत शहर पोलिसांनी सुमारे साडेपाच लाख रुपये बाजार मूल्य असलेली लोगान कंपनीची कार (क्र.एम.एच.04/ईडी.7283) मध्ये दडवून ठेवलेल्या विमल कंपनीच्या पान मसाल्याचे 38 हजार 160 रुपये किंमतीचे 318 पॅकेट, रॉयल 717 तंबाखूचे 9 हजार 540 रुपये मूल्याचे तितकेच पॅकेट असा एकूण 5 लाख 97 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

या प्रकरणी पो.शि.सचिन उगले यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी संगमनेरातील नायकवाडपुरा परिसरात राहणार्या अफ्रोज रफीक शेख (वय 26), कैफ अन्वरखान पठाण (वय 26) आणि कोळपेवाडी येथील रितेश सुभाषचंद्र गदिया या तिघांवर भा.दं.वि. कलम 188, 272, 273, 328 सह अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 59, 26 (2) (4) प्रमाणे गुन्हा दाखल करुन संशयितांना अटक केली आहे. या कारवाईने संगमनेरातील गुटखा तस्करी पुन्हा एकदा चर्चेत आली असून गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

तत्कालीन उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांच्या पुढाकारातून राज्यात गुटख्याचे उत्पादन, साठवणूक व विक्री करण्यावर बंधने आली. 2006 साली त्यासाठी कायदाही अस्तित्वात आला. या सर्व गोष्टींना जवळपास दीड दशकांचा कालावधी लोटूनही राज्यातील गुटखा विक्री थांबवण्यात मात्र सरकारला पूर्णतः अपयशच आले. विशेष म्हणजे पूर्वी राज्यात गुटख्याला परवानगी असताना त्यातून राज्य सरकारला मोठा महसूल मिळत असे. मात्र सरकारने उत्पादन, साठवणूक व पुरवठ्यावर निर्बंध आणल्यानंतर राज्याला गुटख्यातून मिळणारा महसूल पूर्णतः बंद झाला.

मात्र त्याचवेळी गुटखा तस्करीचा जन्म होवून त्यातून गुटखा विक्री रोखण्याची थेट जबाबदारी असलेल्या अन्न व भेसळ विभागासह पोलिसांची वचकही निर्माण झाली. आजही या तस्करीपोटी ठिकठिकाणच्या अन्न व भेसळ विभागातील बड्या अधिकार्यांसह पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात चिरीमिरी दिली जाते व बंदीपूर्वी ज्या वेगाने गुटखा वितरित होत त्याच वेगाने आजही गुटखा विक्री होते यावरुन सरकारच्या निर्णयाने नुकसान कोणाचे झाले व फायदा कोणाचा झाला याचे परीक्षण करण्याचीही वेळ येवून ठेपली आहे.

जिल्ह्यात कर्नाटकातील निपाणी येथून हिरा कंपनीचा गुटखा मोठ्या प्रमाणात येतो. संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील संतोष डेंगळे हा जिल्ह्यातील सर्वात मोठा गुटखा तस्कर त्याच्या वितरणाची जबाबदारी सहज पूर्ण करतो. त्यासाठी अन्न व भेसळ विभाग व पोलिसांना सांभाळण्याची जबाबादारीही तो पेलतो. एका अनधिकृत स्रोताच्या माहितीनुसार दर महिन्याला एकट्या या कंपनीकडून विविध अधिकार्यांना तब्बल 60 लाखांहून अधिक रक्कमेचे हप्ते पोहोचवले जातात यावरुन गुटखा तस्करीच्या वलयाचा सहज अंदाज येतो.

