वादग्रस्त पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांची तडकाफडकी बदली! मध्यरात्री तालुका पोलीस ठाण्यात झालेल्या गोंधळानंतर पाचच मिनिटांत ‘कंट्रोल’ जमा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
काही ना काही कारणाने सतत चर्चेत आलेले, नको त्या प्रकरणाचाही वास घेणारे आणि अवैध धंद्यांना अगदी छातीठोकपणे पाठबळ देत असल्याचा आरोप झालेले संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे ‘वादग्रस्त’ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांची अखेर अत्यंत तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांना तत्काळ थेट नियंत्रण कक्षात हजर होण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. त्यांचा पदभार शुक्रवारी मध्यरात्रीच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातच ‘मलाईदार’ पोलीस ठाण्याच्या शोधात असलेल्या पाटील यांना तालुक्यातील एका ‘मिसींग’ प्रकरणातील नाहक हस्तक्षेप भोवल्याची पोलीस वर्तुळात चर्चा असून या तडकाफडकी कारवाईने जिल्हा पोलीस दलातही खळबळ उडाली आहे.


याबाबत विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील एक आंतरजातीय जोडपे लग्न करण्याच्या इराद्याने गावातून पसार झाले होते. त्यांनतर मुलीच्या पालकांनी तालुका पोलीस ठाण्यात ‘मिसींग’ही दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांचा शोध सुरु असतांना संबंधित जोडपे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले व त्यांनी आपण कायदेशीर विवाह केला असल्याचे दाखले समोर ठेवले. नियमानुसार मुलगा व मुलगी वयात असतांना व त्यांनी स्वमर्जीने विवाह केलेला असतांना त्यांना कोणीही आडकाठी आणू शकत नाही. हे माहीत असतांनाही पो.नि.पाटील यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला.


त्यामुळे शुक्रवारी (ता.30) रात्री तालुका पोलीस ठाण्यात मोठे महानाट्य घडले. आपल्या मनमर्जीने काम करणारे आणि पोलीस ठाणे म्हणजे आपलेच ‘वतन’ आहे असे समजून मनात येईल तसे करण्याची वृत्ती बळावलेल्या पो.नि.पाटील यांनी मोठ्या समुदायाच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केरीत मनमानी करण्याचा प्रयत्न केला. अखेर हा वाद थेट राजकीय दरबारात पोहोचला. त्यांनीही पो.नि.पाटील यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही दाद न दिल्याने पो.नि.पाटील यांची संगमनेर तालुक्यातील कारकीर्द संपुष्टात आल्याचे तेव्हाच निश्‍चित झाले होते. मात्र ते इतक्या जलदगतीने होईल याची अपेक्षा नव्हती.


सदर प्रकरण अंगलट आल्याने व त्यातही पो.नि.पाटील यांनी संगमनेरचे राजकारणच अंगावर घेतल्याने शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता त्यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला. सदरचा आदेश निघताच तत्काळ प्रभावाने त्यांना नगरच्या मुख्यालयात हजर होण्याचेही आदेश देण्यात आले. त्याशिवाय आदेश प्राप्त होताच तालुका पोलीस ठाण्याचा पदभार सोडून तो शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांच्याकडे सोपविण्यासही सांगीतले गेले होते. त्यानुसार पो.नि.परमार यांनी मध्यरात्रीच तालुका पोलीस ठाण्याचा पदभार हाती घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस दलाच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच मध्यरात्री एखाद्या अधिकार्‍याचा बदली आदेश निघाला असेल व मध्यरात्रीच दुसर्‍या अधिकार्‍याने एखाद्या पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारला असेल.


पो.नि.पाटील यांना संगमनेर तालुक्यातीलच पोलीस ठाणे हवे होते. त्यासाठी त्यांनी गेल्या वर्षभरापासूनच ‘फिल्डींग’ लावण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला ते संगमनेर शहर पोलीस ठाण्यासाठी इच्छुक होते. मात्र जूनमध्ये देवगाव जवळील वाळु तस्करांच्या पाठलाग प्रकरणातून घडलेला अपघात, त्यात गेलेले तिघांचे बळी, तालुक्यातील मटका, जुगार, गांजा व गुटखा तस्करी, यासह गोवंश तस्करीतील वाहनांवरील प्रेम आदी गोष्टींमुळे त्यांच्या नावावर फुली पडली होती. त्यामुळे त्यांनी घारगाव पोलीस ठाण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यात त्यांना यश मिळतंय असे वाटत असतांना ग्रामीणभागातील ‘मिसींग’चे किरकोळ प्रकरण त्यांना भोवले आणि त्यांची थेट ‘कंट्रोल’मध्ये उचलबांगडी झाली. जिल्ह्याच्या इतिहासात बहुधा इतक्या तडकाफडकी बदली होण्याच्या या पहिल्याच प्रकाराने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.


मनमानी पद्धतीने काम करणारा अधिकारी म्हणून तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांची तालुक्यात ओळख होती. कोणत्याही प्रकरणात केवळ स्वहित पाहण्याच्या वृत्तीमुळे गेल्या काही कालावधीत तालुका पोलीस ठाणे चर्चेत आले होते. मात्र प्रशासकीय पातळीवर फारसा हस्तक्षेप न करणार्‍या इथल्या राजकारणामुळे प्रत्येकवेळी त्यांचे फावले. पण शुक्रवारी त्यांनी नको त्या प्रकरणात हात घातल्याने अखेर त्याचे दुष्परीणाम त्यांना भोगावे लागले आणि मध्यरात्री त्यांच्या बदलीचे आदेश निघाले. या एका प्रकरणाने गेल्या वर्षभरातील ऐच्छिक ठिकाणी जाण्यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांवर मात्र पाणी फिरले.

Visits: 135 Today: 3 Total: 1111077

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *