कसायांच्या टोळीपाठोपाठ आता वाटमार्‍यांचे कंबरडे मोडले! संगमनेरच्या गुन्हेगारी जगतावर पुन्हा ‘स्ट्राईक’; अकोले नाक्यावरील टोळीवरही ‘मकोका’..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून आपल्या गुन्हेगारी कृत्यांनी उच्छाद मांडणार्‍या आणि महामार्गावर दहशत निर्माण करुन वाहनधारकांना लुटणार्‍या संघटीत टोळ्यांविरुद्ध पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संगमनेरातील कुप्रसिद्ध गोवंश कत्तलखान्यांचा टोळीप्रमुख नवाज जावेद कुरेशी आणि त्याच्या संपूर्ण टोळीच्या पापाचा घडा भरल्यानंतर, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ऐतिहासिक बडगा उगारुन त्यांना जेरबंद केले होते. कसायांच्या टोळीवर मोक्काच्या धर्तीवर झालेल्या या पहिल्या ऐतिहासिक कारवाईची शाई अद्यापही ओली असताना आता संगमनेरात पुन्हा एकदा पोलिसांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. शहरातील अकोले नाक्यावर दहशत माजवून महामार्गावर वाहने लुटणार्‍या अक्षय दादा चव्हाण आणि त्याच्या सहाजणांच्या टोळीवर नवीन कायद्यानुसार संघटीत गुन्हेगारीच्या कठोर कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे या टोळीचे कंबरडे मोडले असून, केवळ संगमनेरच नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतात घबराट निर्माण झाली आहे.


या कारवाईच्या पार्श्वभूमीत गेल्या 28 एप्रिलरोजी रात्रीच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील डी-मार्टजवळ अज्ञात सहा इसमांनी एका मालवाहू पिकअप वाहनाला चारचाकी गाडी आडवी लावून थांबवले होते. फिर्यादी शैलेश नारायण शेलार (वय 34, रा. खैरेवाडी, पळफाड, नाशिक) हे आपल्या पिकअप वाहनातून नाशिककडून चेन्नईकडे जात असताना, या टोळीने प्रचंड आरडाओरडा करत त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी या टोळीने कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी जवळील 95 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवून या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अक्षय दादा चव्हाण (वय 21, रा.अकोले नाका) याच्यासह रोहीत उर्फ कोकण भिकाजी शिंदे (वय 25), संदिप उर्फ जब्या संजय वाल्हेकर (वय 25), आदित्य संजय शिंदे (वय 21), अभिषेक अशोक लोंढे (वय 22) आणि साई रामपुरी गोसावी (वय 25 सर्व रा.अकोलेनाका) या सहा जणांना निष्पन्न करून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.


धक्कादायक म्हणजे, अटक केलेल्या आरोपींचा गुन्हेगारी इतिहास तपासला असता, या टोळीने संगमनेर शहर व परिसरात प्रचंड दहशत निर्माण केल्याचे उघड झाले. या टोळीचा म्होरक्या अक्षय चव्हाण आणि त्याच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्र बाळगून दरोडा टाकणे, जबरदस्तीने चोरी करणे, गंभीर दुखापत करणे, दिवसा व रात्री घरफोड्या करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि विनापरवाना घरात घुसणे अशा गंभीर स्वरुपाचे तब्बल 30 गुन्हे दाखल आहेत. ही टोळी स्वतःच्या आर्थिक आणि भौतिक फायद्यासाठी संघटीत टोळी बनवून सातत्याने गुन्हेगारी कृत्ये करत होती. या गुन्हेगारांना कायद्याचा कोणताही धाक उरला नव्हता, ज्यामुळे सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याविषयी भीती निर्माण झाली होती. स्थानिक पोलिसांनी अटक केल्यानंतरही त्यांची दहशत कमी होत नसल्याने अखेर वरिष्ठ पातळीवरुन या टोळीवर वज्रप्रहार करण्यात आला.


गुन्हेगारांची वाढती गुंडगिरी मोडून काढण्यासाठी संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाला या टोळीविरुद्ध संघटीत गुन्हेगारीचे कलम वाढवण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्याचे अवलोकन करुन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी वरील टोळी विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम 111 अन्वये कारवाईस मान्यता दिली. या कलमाचा प्रभाव राज्याच्या मकोका कायद्याप्रमाणेच असल्याने त्यानुसार कारवाई होणार्‍या आरोपींना सहजासहजी जामीन मिळणे दुरापास्त असते. या कलमान्वये आरोपीला जन्मठेप अथवा फाशीच्याही शिक्षेची तरतूद आहे.


उल्लेखनीय बाब म्हणजे, अहिल्यानगर जिल्ह्यात अशा प्रकारे संघटीत गुन्हेगारी कायद्याचा सलग दोन वेळा वापर करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच ऐतिहासिक घटना ठरली आहे. यापूर्वी संगमनेरातील कुप्रसिद्ध गोवंश कत्तलखान्यांचा टोळीप्रमुख नवाज जावेद कुरेशी याच्या संपूर्ण ‘कसाईटोळी’ला अशाच कडक कायद्यान्वये जेरबंद करुन मोक्काच्या धर्तीवर त्यांचे कंबरडे मोडले होते. कसायांच्या टोळी पाठोपाठ आता महामार्गावर चालकांना लुटणार्‍या वाटमार्‍यांच्या टोळीवरही वज्रप्रहार झाल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक वाढला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्यासह शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.


संगमनेरात सलग दुसर्‍यांदा झालेल्या संघटीत गुन्हेगारी कलमाच्या वापरामुळे तालुक्यातील कोणत्याही गुन्हेगारी टोळीची यापुढे गय होणार नसल्याचा स्पष्ट संदेश गेला आहे. या कारवाईत यंत्रणांमधील काहींना हाताशी धरुन राजरोस कत्तलखाने चालवणारे कसायी असो, वा महामार्गावर दरोडा घालणारी वाटमारी टोळी, या प्रत्येकाचे कंबरडे मोडण्याची सुरुवात झाली असून अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या ‘नो टॉलरन्स’ धोरणामुळे गुन्हेगारी जगतात कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. अशाच प्रकारची एखादी कारवाई वाळू तस्करांच्या टोळीवरही झाल्यास मुळा, प्रवरा, म्हाळुंगी, आढळा व कस या नद्यांमधून अहोरात्र होणार्‍या वाळू उपशाला चाप बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Visits: 2 Today: 2 Total: 1844346

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *