पाच दिवसांपूर्वी मारहाण झालेल्या तरुणाचा मृत्यू! आठजणांवर दाखल होता गुन्हा; खुनाच्या कलमान्वये कारवाईची मागणी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपापसातील वादातून आठजणांच्या टोळक्याकडून आपल्या परिवाराशी सुरु असलेल्या वादात मध्यस्थी करणार्‍या 38 वर्षीय तरुणाचा पाच दिवसांनी मृत्यू झाला. गेल्या रविवारी भरदुपारी कुरणरोडवर घडलेल्या या घटनेत त्याच्यासह त्याची आई, पत्नी, तीन वर्षांचा मुलगा, भाऊ, भावजयी अशा सर्वांनाच बेदम मारहाण झाली होती. या सर्वांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले होते. या प्रकरणी प्राणघातक शस्त्रांसह हल्ला केल्यावरुन गुन्हाही दाखल आहे. मात्र शुक्रवारी अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारानंतर घरी परतलेल्या सलीम शेख यांना पुन्हा रुग्णालयात आणण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मयत तरुणाचा मृत्यू मारहाणीमुळेच झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र विच्छेदन अहवाल आल्याशिवाय त्याबाबत स्पष्टता येणार नाही.


गेल्या रविवारी (ता.31) दुपारी बाराच्या सुमारास कुरणरोड परिसरात सदरचा प्रकार घडला होता. या प्रकरणात शेजारी राहणार्‍या एका महिलेसह आठजणांकडून फिर्यादी सलमान हरुन शेख यांच्या पत्नी व आईला शिवीगाळ व मारहाण सुरु असल्याने त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता जमलेल्या टोळक्याने त्यांना लाकडी दांडक्यासह अन्य हत्यारांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार सुरु असताना फिर्यादाचा मोठा भाऊ सलीम हरुन शेख त्याची पत्नी महेक आपला तीन वर्षांचा मुलगा हुजेबसह घटनास्थळी आले व त्यांनी भांडणं मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी टोळक्यातील दोघा-तिघांनी त्यांनाही लक्ष्य करुन लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली, त्या गदारोळात त्यांच्या कडेवरील मुलगा जमिनीवर पडल्याने त्यालाही मार लागला. पतीच्या मदतीला धावलेल्या महेक यांनाही मारहाण करुन त्यांचा विनयभंग करण्यात आला.


या प्रकरणी जखमी झालेल्या सलमान हरुन शेख यांनी रुग्णालयात नोंदवलेल्या जवाबावरुन पोलिसांनी अबु बकर, नर्गिस शेख, आवेश मिर्झा, अकबर शेख, सादीक मिर्झा, अफझल मिर्झा, इरफान शेख व शाबीर शेख अशा आठजणांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 74, 189 (2), 190, 191 (2), 118 (1), 115 (2), 351 (2), 352, 324 (4) प्रमाणे गुन्ह्याची नोंदही केली आहे. या घटनेनंतर जखमी झालेल्या फिर्यादी सलमान शेखसह त्यांचा मोठा भाऊ सलिम व तोहसिन, आई जुबेदा, पत्नी रुक्सार, भावजयी महेक व पुतण्या हुजेब अशा सर्वांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते.


शुक्रवारी (ता.5) रविवारच्या मारहाणीत जखमी होवून उपचारानंतर घरी परतलेल्या सलिम शेख (वय 38) यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. सदरचा मृत्यू मारहाणीमुळेच झाल्याचा दावा करीत मयत तरुणाच्या परिवाराने सुरुवातीला रुग्णालयात व नंतर पोलीस ठाण्यात ओरडून सांगण्यास सुरुवात केली. मात्र मयताचे शवविच्छेदन झाल्याशिवाय कोणताही निष्कर्ष निघणे अशक्य असल्याने पोलिसांना विच्छेदन अहवालाची प्रतिक्षा आहे. या घटनेने परिसरात मात्र शोककळा पसरली असून किरकोळ वादाच्या पार्श्‍वभूमीवर एका तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Visits: 2 Today: 2 Total: 1844348

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *