‘मुळा’तील बोट विक्री प्रकरणी चौकशी समिती नियुक्त चार अधिकारी एक आठवड्यात देणार चौकशी अहवाल

नायक वृत्तसेवा, राहुरी
मुळा धरणातील कालबाह्य बोट परस्पर विकल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार अधिकार्‍यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यांना एक आठवड्यात चौकशीचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी समितीच्या अहवालानुसार जबाबदार दोषी अधिकार्‍यांविरुद्ध वरिष्ठ कार्यालयात कारवाईची शिफारस केली जाईल, असे अहमदनगर येथील मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले.

जलसंपदा खात्याचे उपअभियंता संजय हेंबाडे (नेवासा उपविभाग), उपअभियंता बाळासाहेब लबडे (अमरापूर उपविभाग), सहायक अभियंता ज्ञानेश्वर शिवगण (कुकाणा शाखा) व शाखा अभियंता राजेंद्र पारखे (अमरापूर शाखा) अशी चौकशी समितीच्या सदस्यांची नावे आहेत. मुळा धरणातील कालबाह्य बोट परस्पर विकल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर जलसंपदा खात्याच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली. धरणाच्या प्रवेशद्वाराजवळील पोलीस चौकीसमोर, जिल्हा परिषदेच्या मालकीची एक नादुरुस्त कालबाह्य बोट ठेवलेली होती. धरणावर प्रवेश करताना प्रथमदर्शनी दिसणारी बंद बोट खटकणारी होती. त्यामुळे वरीष्ठांच्या आदेशाने कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी धरण शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे यांना बोट हलवून दुसरीकडे नजरेआड ठेवण्यास सांगितले.

वरीष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करताना धरणावरील अधिकार्‍यांनी बोट दुसरीकडे हलविण्याऐवजी परस्पर विकली. जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांनी ही बोट 5 लाख 30 हजार रुपयांना विकल्याचा आरोप केला. कार्यकारी अभियंता पाटील यांनी बोट विकल्याच्या प्रकरणाला दुजोरा दिला. त्यामुळे वरीष्ठांच्या आदेशात गल्लत करणारा अधिकारी अडचणीत आला आहे.

Visits: 137 Today: 2 Total: 1599921

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *