वडगाव पान ग्रामपंचायतमध्ये पहिल्याच बैठकीपूर्वी बहिष्कार! नूतन सरपंच गटावर उपसरपंच गटाचा दडपशाहीचा तीव्र आरोप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडून निकालही लागला. मात्र, त्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणची समीकरणे बदलली. निवडणुकीपूर्वी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीत असणार्‍यांना आरक्षणाने जोरदार धक्का बसला. यानंतर मात्र नवा अध्याय सुरू झाला असून वडगाव पान ग्रामपंचायतमध्ये सरपंच गटावर उपसरपंच गटाने दडपशाहीचा आरोप करत पहिल्याच बैठकीपूर्वी बहिष्कार टाकल्याचा प्रकार गुरुवारी (ता.18) पहायला मिळाला.

वडगाव पान ग्रामपंचायतसाठी तेरा संख्याबळ आहे. नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये शेतकरी ग्रामविकास मंडळाच्या सात सदस्यांनी विजयी पतका फडकावली आहे. तर विरोधी गटाने सात जागांवर विजय मिळवला आहे. परंतु, राजकीय खलबते होवून विरोधी गटाने शेतकरी ग्रामविकास मंडळातील विजयी झालेला एक सदस्य दडपशाहीने फोडून आपल्या गोटात घेतला. यामुळे सरपंच पदावर मोहोर उमटविणे सोपे झाले. विशेष म्हणजे ग्रामविकास मंडळाला अंधारात ठेवून सरपंचपदाचा पदभारही उरकून घेतला. त्यानंतर पुन्हा राजकीय खलबते घडून विरोधी गटात डेरेदाखल झालेला सदस्य ग्रामविकास मंडळाने आपल्या गोटात घेतला. सरपंच गटावर दडपशाहीने आमचा सदस्य फोडून पदभार घेतला असल्याचा सणसणीत आरोप करुन गुरुवारी आश्चर्यकारकरित्या घडलेल्या घडामोडींनंतर फोडलेला सदस्य मोठ्या दिमाखात आपल्या गटात दाखल करुन घेतला. आणि ग्रामविकास मंडळातील विजयी झालेले सदस्य सोमनाथ गायकवाड यांनी उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारत पहिल्याच बैठकीपूर्वी बहिष्कार टाकला.

संगमनेर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाचेच निर्विवाद वर्चस्व असल्याचे नुकत्याच लागलेल्या निकालांवरुन स्पष्ट झाले आहे. तर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणची समीकरणे बदलल्याने जोरदार राजकीय घडामोडी घडत असल्याचे समोर येत आहे. याचा नवा अध्याय गुरुवारी वडगाव पान ग्रामपंचायतपासून सुरू झाला आहे. तेरापैकी ग्रामविकास मंडळाचे सात सदस्य विजयी होवूनही विरोधी गटाने सरपंचपदावर आपला वरचष्मा दाखवला. यासाठी ग्रामविकास मंडळाचा एक सदस्य फोडून आपल्या गोटात दाखल केला. परंतु, हा आनंद फार काळ टिकविण्यात त्यांना यश आले नाही. ग्रामविकास मंडळाने वेगाने चक्रे फिरवत विरोधी गटात गेलेल्या सदस्याला आपल्या गटात दाखल करुन घेत उपसरपंचपदाचा पदभार स्वीकारुन शह दिला.

यावेळी थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, महेश मोरे, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, पंचायत समिती सदस्या बेबी थोरात, डॉ.दादासाहेब थोरात, सुभाष गायकवाड, नीलेश थोरात, संभाजी थोरात, नजीर तांबोळी, आबासाहेब थोरात, सुधीर थोरात, गणेश थोरात, बाळासाहेब गडगे, बाबा गडगे, सागर गायकवाड, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री अरुण कुळधरण, गणेश गडगे, वंदना थोरात, माया गायकवाड, सोनाली गडगे, मनीषा थोरात उपस्थित होते.


विरोधी गटाने सरपंच निवडीच्या वेळी आमच्या सदस्यांवर मानसिक दबाव निर्माण करुन दडपशाहीने आमचा सदस्य फोडला. परंतु, आम्ही सर्व एक आहोत. पहिल्या सभेत स्पष्ट बहुमत मिळवू न शकणार्‍या सरपंचाने नैतिकता म्हणून राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी.
– बाबा ओहोळ (अध्यक्ष-साखर कारखाना, संगमनेर)

Visits: 20 Today: 1 Total: 117824

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *