देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत! भाजप आमदार किसन कथोरे यांची साईचरणी प्रार्थना

नायक वृत्तसेवा, शिर्डी
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुरबाड विधानसभेचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी बुधवारी (ता.22) शिर्डीत मध्यान आरतीला हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं साईबाबांना घातल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी दिली आहे.

सर्व आमदारांना मुंबईत बोलावले असताना मुरबाडचे आमदार कथोरे हे शिर्डीत साईंच्या दर्शनाला पोहोचले आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी साईबाबांना साकडं घातलं. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मतदारसंघासाठी निधी मिळत नसल्याने शिवसेना आमदारांमध्ये खदखद होती. निधी मिळत नसल्याचे अनेक शिवसेना आमदारांनी मला बोलून दाखवले. मुख्यमंत्री त्यांचा असताना निधी मिळत नसेल तर सेना आमदारांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्या सर्व आमदारांना मनापासून शुभेच्छा असंही कथोरे म्हणाले.

दरम्यान, ते पुढे म्हणाले की, फक्त भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे सरकार होईल. भाजप ज्यादिवशी सत्ता स्थापन करेल त्यादिवशी आणखी आमदार जोडले जातील. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ताकदवान नेते आहेत. 40 पेक्षा जास्त आमदार त्यांच्या बरोबर आहेत. मग शिवसेना राहिली कुठे? शिवसेनेत किती खदखद आहे हे आता स्पष्ट झालं आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. ही भाजपची खेळी असण्याचा प्रश्नच नाही. राज्यसभा, विधानपरीषद निवडणुकीत त्यांची खदखद बाहेर पडली. हे सरकार पाडू असे फडणवीस कधीही म्हणाले नाही. त्यांच्या कर्माने हे सरकार पडेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आणि ते पडलंय, असे चित्र आहे, असंही किसन कथोरे यांनी म्हटलं आहे.
