संगमनेर शहराजवळील ‘ह्युंदाई’ चारचाकीचे दालन फोडले! मोठा ऐवज चोरल्याची शक्यता; पोलिसांकडून तपास सुरू

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुका गेल्या आठवडाभरापासून विविध घटनांनी चांगलाच चर्चेत आलेला आहे. वेल्हाळे शिवारातील चारचाकी वाहन दालनातील चोरी, पठारावरील वन्यजीवांची तस्करी, दुचाकी चोरट्यांची टोळी व पोलिसांची बिनतारी संदेश यंत्रणेची चोरी अशा विविध घटनांनी तालुका हादरलेला असतानाच पुन्हा मोठी चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. शहरापासून काही अंतरावर असणार्‍या कोल्हार-घोटी मार्गावरील ह्युंदाई कंपनीचे चारचाकी वाहनाचे दालन मंगळवारी (ता.16) मध्यरात्रीच्या सुमारास फोडत चोरट्यांनी मोठा ऐवज चोरुन पोबारा केल्याची शक्यता आहे. याबाबत दालन व्यवस्थापन व पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. यामुळे एकामागून एक घडणार्‍या चोर्‍यांमुळे शहर पोलिसांपुढे आता या चोरीचा तपास लावण्याचे आव्हान ठाकले आहे.

याबाबत शहर पोलीस सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, शहरापासून काही अंतरावरच कोल्हार-घोटी मार्गावर ह्युंदाई कंपनीचे दालन आहे. नेहमीप्रमाणे हे दालन सोमवारी (ता.15) बंद करुन अधिकारी व कर्मचारी घरी गेले होते. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दालनाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लिंबाच्या झाडाच्या सहाय्याने संरक्षक भिंतीच्या आतमध्ये प्रवेश केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यानंतर शटरचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. रोखपाल कक्षाची व कोठारामधील सामानाची उचकापाचक करत ऐवज चोरल्याची शक्यता आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यामध्ये दोन चोरटे प्रथमदर्शनी दिसत असून अजूनही चोरटे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सकाळी नेहमीप्रमाणे दालन खुले करण्यासाठी सुरक्षा रक्षक, अधिकारी व कर्मचारी आले असता हा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. तत्काळ याची माहिती दालनाचे संचालक संदीप शिरोडे यांना दिली. तसेच पोलिसांना माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दालनाची संपूर्ण तपासणी करुन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा ठरविली आहे. यानंतरच किती ऐवज चोरीला गेला आहे हे निष्पन्न होणार आहे. वृत्त लिहेपर्यंत शहर पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

यापूर्वी वेल्हाळे शिवारातील चारचाकी वाहनाचे दालन फोडून सव्वा लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. अद्यापही या घटनेचा तपास लागला नाही. त्यातच पुन्हा चारचाकीचे दालन चोरट्यांनी लक्ष्य करुन ऐवज चोरल्याची शक्यता आहे. एकामागून एक होणार्‍या चोर्‍यांसह पठारभागात वन्यजीवांची तस्करी करणारी टोळी व दुचाकी चोरट्यांची टोळी पकडली असून सोळा दुचाक्या हस्तगत केल्या आहेत. विशेष म्हणजे बाळेश्वर मंदिराजवळ असलेली पोलिसांची बिनतारी संदेश यंत्रणा देखील अपवाद ठरली नाही. यामुळे शहर, तालुका व घारगाव पोलिसांपुढे घटनांचा तपास करण्याचे मोठे आव्हान ठाकले आहे.

Visits: 247 Today: 4 Total: 1587376

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *