राहुरी विद्यापीठ परिसरात विद्यालयाकडून पक्षीगणना तीन शिक्षकांसह 65 विद्यार्थ्यांचा पक्षीगणनेत सहभाग

नायक वृत्तसेवा, राहुरी
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्यावतीने राष्ट्रीय हरित सेनेतर्फे कृषी विद्यापीठ परिसरात पक्षीगणना करण्यात आली. तीन किलोमीटर चौरस प्रक्षेत्रात तीन शिक्षक व 65 विद्यार्थ्यांनी पक्षीगणनेत भाग घेतला. त्यात यंदा खंड्या (किंगफिशर) व मोरांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसली. तर साळुंकी, कावळे, चिमणी व बुलबुल यांची संख्या तुलनेने कमी होताना दिसली आहे.

मागील सात वर्षांपासून हरित सेनेचे सचिव बाळासाहेब डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षीगणना केली जाते. शिक्षक अरुण तुपविहिरे, विद्यार्थी हर्ष तुपविहिरे, ऋतुराज गायकवाड, संस्कार मेटकर, वेदिका सातपुते, खुशी चुत्तर, कौस्तुभ मुठे, अथर्व शिंदे, समीक्षा नाईक, वैष्णवी नवले, ऋतुजा काचोळे, राहुल पठारे, प्रणव बन, अविष्कार भोरे, राज दौंड यांनी पक्षीगणनेत भाग घेतला. मुख्याध्यापिका आशा धनवटे, उपमुख्याध्यापक नंदकुमार मुळे, पर्यवेक्षक नबाजी रहाणे, प्रशासक जितेंद्र मेटकर व संस्थेचे सचिव डॉ.राजेंद्र वाघ यांनी त्यांना सहकार्य केले.

दरवर्षी ठरलेल्या भागात गणना केली जाते. बारा गटांत पाच-सहा सदस्य व एका गटप्रमुखामार्फत सकाळी पावणे सात ते आठ वाजेपर्यंत एकाच वेळी गणना सुरू होते व थांबविली जाते. पूर्वतयारी म्हणून विद्यार्थ्यांना अगोदर वर्गात स्क्रीनवर गणना करण्याच्या भागाची माहिती, गणना करण्याची पद्धत सांगण्यात येते. महाराष्ट्रात आढळणार्‍या पक्षांची सचित्र ओळख करून, छापील रंगीत चित्र किंवा मोबाईलमध्ये फोटो दिला जातो. गटातील सदस्य गटप्रमुखाला नोंदणीसाठी, पक्षी मोजण्यासाठी मदत करतात. दुर्बिण, कॅमेरा व पक्षांची चित्रे याद्वारे गणना होते. नगर-मनमाड महामार्गाजवळ मुळा उजव्या कालव्यापासून पूर्व व पश्चिमेकडे, उद्यान विद्या विभाग, अतिवृष्टी व शिकारी पक्षी यामुळे पक्षी संख्येवर परिणाम होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.

पक्षीनिहाय संख्या
मोर 64
पोपट 222
भारद्वाज 80
चिमणी 328
कावळे 218
बगळे 302
बुलबुल 134
खंड्या 47
साळुंकी 143
होला 128
एकूण ः 2476

Visits: 118 Today: 1 Total: 1419690

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *