राहीबाई म्हणजे अहमदनगर जिल्ह्याला लाभलेले वरदान : सालीमठ कोंभाळणे येथील गावरान बीजबँकेला जिल्हाधिकार्‍यांची भेट


नायक वृत्तसेवा, अकोले
देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या बायफ संचलित कोंभाळणे येथील पद्मश्री बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांच्या मार्गदर्शनाने उभ्या राहिलेल्या देशातील पहिल्या देशी बियाणे बँकेला अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नुकतीच भेट दिली आहे. त्यावेळी राहीबाई म्हणजे अहमदनगर जिल्ह्याला लाभलेले वरदान असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकार्‍यांनी काढले.

ग्रामीण भागाचे विशेष आकर्षण आणि आदर असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच आदिवासी भागाचा दौरा केला. त्यांच्या समवेत प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे उपस्थित होते. देशी बियांच्या संवर्धनासाठी देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या बीजमाता राहीबाई पोपेरे यांची भेट घेऊन या विषयाची सविस्तर माहिती जिल्हाधिकार्‍यांनी घेतली. राहीबाई यांचे पारंपरिक बियाणे संवर्धनातील ज्ञान व अभ्यास बघून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. राहीबाई पोपेरे यांनी जतन केलेल्या विविध वाणांची माहिती जिल्हाधिकार्‍यांना करून दिली. त्यांच्या संग्रही असलेले भाजीपाला बियांचे संच यावेळी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना भेट दिले.

आदिवासी अतिदुर्गम भागात अशा पद्धतीचे काम उभे राहिल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत या विषयाचे ज्ञान पोहोचले पाहिजे यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. राहीबाई यांनी जतन केलेल्या विविध गावरान वाणांची तंत्रशुद्ध माहिती आपणास प्रेरणा देऊन गेली असे गौरवोद्गार काढत अहमदनगर जिल्ह्यात काम करताना या ज्ञानाचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. राहीबाई पोपेरेंनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांचा यथोचित सत्कार कळसूबाई बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेच्यावतीने केला.

Visits: 4 Today: 1 Total: 23158

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *