संगमनेरच्या कसायांना शहर पोलिसांचे सुरक्षाकवच! पोलीस उपाधिक्षकांचीही दिशाभूल; तडीपारीच्या प्रस्तावातच फेरफार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गोवंश हत्येच्या कारणाने राज्यात वारंवार बदनामी होणार्या संगमनेर शहरातील बेकायदा कत्तलखान्यांना संगमनेर शहर पोलिसांकडून सुरक्षाकवच प्रदान करण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे येथील मोठ्या कत्तलखान्यांचा मुख्य सूत्रधार असलेल्या एका कसायाविरोधात वरिष्ठांनी तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र असे केल्यास आपल्या मलाईवरच त्याचा परिणाम होईल या विचाराने शहर पोलिसांनी चक्क पोलीस उपअधिक्षकांचीच दिशाभूल केली असून त्यांना सादर केलेल्या प्रस्तावात ‘त्या’ आरोपीच्या नावातच बदल केला आहे. त्यामुळे तडीपारीची नोटीस बजावणार्या पोलिसांना अद्यापही ‘त्या’ नावाचा आरोपी अढळ झालेला नाही. या प्रकारानंतर संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतप्त झाल्याचे वृत्त असून शहर पोलिसांनी जाणीवपूर्वक केलेल्या या कृत्याचा सविस्तर अहवालही जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे सादर करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून संगमनेरात बेकायदा गोवंश कत्तलखाने अव्याहतपणे सुरु आहेत. दहा वर्षांपूर्वी राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात गोहत्येसह गोवंशाच्या कत्तलीवरही निर्बंध आणले, त्यासाठी गोवंश हत्याबंदी कायदाही अस्तित्वात आला. तेव्हापासून संगमनेरातील कत्तलखान्यांवर पोलिसांकडून कारवाया सुरु झाल्या. या कालावधीत येथील कत्तलखान्यांवर शेकडोंवेळा छापे पडले असून त्यातून हजारों जिवंत गोवंशासह, लाखों किलो वजनाचे त्यांचे कापलेले मांस, वाहने अशा कोट्यवधीच्या मुद्देमालासह शेकडों कसायांवर वारंवार गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र या उपरांतही संगमनेरातील कत्तलखान्यांमधील गोवंशाच्या रक्ताचे पाट थांबवण्यात पोलीस अपयशीच ठरले आहेत.
तीन वर्षांपूर्वी 2 ऑक्टोबर 2021 रोजी संगमनेरातील भारतनगर या कत्तलखान्यांसाठी कुपरिचित असलेल्या भागात अहमदनगर पोलिसांच्या पथकाने परस्पर छापा घातला होता. या कारवाईत या परिसरात साखळी पद्धतीने असलेल्या दहा कत्तलखान्यांवर कारवाई करीत पोलिसांनी तब्बल 31 हजार किलो गोवंशाच्या मांसासह 72 जिवंत जनावरे आणि रोकडसह वाहने असा एकूण एककोटी रुपयांहूनही अधिक मुद्देमाल हस्तगत करीत जवळपास सोळाहून अधिक कसायांवर गुन्हे दाखल करीत त्यातील बहुतेकांना गजाआडही केले होते. या कारवाईदरम्यान एका कत्तलखान्यात पोलीस पथकाला तीन डायर्या व काही लाखांची रोकडही सापडली होती. विशेष म्हणजे ‘त्या’ डायर्यांमध्ये कसायांकडून दरमहा कोणाकोणालाही गायींच्या रक्ताने माखलेला हप्ता पोहोच होतो याचा संपूर्ण लेखाजोखाही मांडलेला होता.
त्यावेळी समोर आलेल्या माहितीतून अगदी जिल्हा मुख्यालयापासून ते शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक दर्जाच्या कर्मचार्यांपर्यंत आणि स्वतःला कथीत राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते म्हणवणार्या काहींसह पत्रकारिता क्षेत्राला कलंक लावणार्यांच्याही नावाचा आणि त्यापुढे त्यांना देण्यात येणार्या रकमेचा स्पष्ट उल्लेख होता. त्यावरुन सदर कत्तलखान्याचा चालकच संगमनेरातील गोवंश कसायांचा ‘सूत्रधार’ असल्याचेही अगदी ठळकपणे समोर आल्याने या प्रकरणात पहिल्यांदाच त्यालाही आरोपी करण्यात आले होते.
या कारवाईनंतर कसायांशी साटेलोटे असल्याचे उघड आरोप झालेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी कोणत्याही स्थितीत शहरात कत्तलखाने सुरु होवू देणार नाही अशी वल्गना केली होती. मात्र त्यांचे ‘चरित्र’ जगजाहीर असल्याने त्यांची कथणी कधीही करणीशी जोडली गेली नाही. त्यामुळे या सर्वात मोठ्या कारवाईनंतरही संगमनेरातील गोवंशाच्या रक्ताचे पाट वाहतेच राहिले आणि त्यातून पोलीस निरीक्षक देशमुख यांच्यासह अनेकांचे गल्लेही भरतच राहिले. या दरम्यान हिंदुत्त्ववाद्यांनी केलेल्या आंदोलनामुळे सर्रास चालणार्या कत्तलखान्यांना काही प्रमाणात मर्यादाही आल्या, मात्र ते कधीही पूर्णतः बंद होवू शकले नाहीत हे वास्तव आहे.
या कारवाईतून कत्तलखान्यांचा सूत्रधार म्हणून समोर आलेल्या ‘त्या’ कसायाने नंतरच्या कालावधीत पुन्हा नव्याने बस्तान बसवून कंबरडे मोडलेले कत्तलखाने पुन्हा उभे केले आणि आपला कारभार सुरु केला. मात्र गांधी जयंतीच्या कारवाईनंतर येथील कत्तलखान्यांची व्यापकता आणि डायर्यांमधून लागेबांधेही उघड झाल्याने स्थानिक पातळीवर पोलीस उपअधिक्षकांच्या पथकाकडून वारंवार छापे घालण्यास सुरुवात झाली, तर गुपचूप कत्तली उरकून बाहेर पाठवण्यात आलेली वाहनेही वेगवेगळ्या ठिकाणी पकडली जावू लागली. त्यातून संगमनेरचे कत्तलखाने नेहमीच चर्चेत राहिले.
या दरम्यान चार महिन्यांपूर्वी संगमनेरच्या पोलीस उपअधिक्षकांनी वारंवार एकाच गुन्ह्यात सापडणार्या आणि येथील कसायांना बंदी असतानाही गोवंशाची कत्तल करण्यासाठी प्रोत्साहन देणार्या ‘त्या’ सूत्रधाराच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शहर पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलिसांनी गेल्याकाही कालावधीत एकामागून एक तब्बल आठ गुन्हे दाखल असलेल्या आणि पोलिसांच्या रेकॉर्डवर ‘सराईत’ ठरलेल्या कसायांच्या ‘त्या’ म्होरक्याचा प्रस्ताव सादर केला. त्यावरुन पोलीस उपअधिक्षकांनी संबंधिताला चारवेळा तडीपारीची नोटीसही धाडली. मात्र प्रत्येकवेळी नोटीसमध्ये नमूद असलेली व्यक्ति वेगळीच असल्याचे समोर येवू लागले.
त्यामुळे पोलीस उपअधिक्षकांच्या पथकाने प्रत्यक्ष मंजूर झालेला तडीपारीचा प्रस्ताव आणि तब्बल आठ गुन्हे दाखल असलेल्या ‘त्या’ सूत्रधाराची कुंडली समोर ठेवून त्याचे अध्ययन केले असता शहर पोलिसांनी त्याला वाचवण्यासाठी मारलेली ‘मेख’ उघड झाली. प्रत्यक्षात शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला कसाई आणि तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तिच्या वडिलांच्या नावात जाणीवपूर्वक फेरफार करण्यात आली. त्यामुळे चारवेळा पोलीस पथक त्याच्या घरी जावून आल्यानंतर त्याच्या वडिलांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्याचे स्पष्ट झाले. त्यातून शहर पोलिसच संगमनेरातील कसायांना ‘सुरक्षाकवच’ प्रदान करीत असल्याचे समोर आले असून या प्रकाराने पोलीस उपअधिक्षक चांगलेच संतप्त झाल्याचे वृत्त आहे. याबाबत त्यांनी आपला गोपनीय अहवालही पोलीस अधिक्षकांकडे पाठवल्याची माहिती दैनिक नायकला प्राप्त झाली आहे.
गेल्याकाही वर्षात येथील गोवंश कत्तलखान्यांच्या कारणावरुन शहरातील जातीय तणावात भर पडली असून यापूर्वी अनेकदा तशी स्थितीही निर्माण झाली होती. मात्र गोवंश कत्तलखान्यातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याने शहर पोलिसांना शांतता सुव्यवस्थेपेक्षा मलाईचाच अधिक गोडवा लागल्याने आजवर शेकडों कारवाया झाल्यानंतरही संगमनेरातील कत्तलखाने सुरुच आहेत. आतातर ते सुरळीतपणे सुरुच रहावेत यासाठी शहर पोलिसच त्यांच्या ‘सूत्रधारा’ला वाचवण्यासाठी चक्क आपल्याच वरीष्ठ अधिकार्यांची दिशाभूल करीत असल्याचे भयानक वास्तवही समोर आले आहे. या प्रकरणाकडे आता पोलीस अधिक्षक किती गांभीर्याने बघतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.