ब्राह्मणवाड्यात लक्ष्या बैलाचा आगळावेगळा अंत्यविधी आरोटे कुटुंबियांना अश्रू झाले अनावर; गाडाशौकिनही उपस्थित
महेश पगारे, अकोले
बळीराजा आपल्या पाळीव प्राण्यांवर जिवापाड प्रेम करत असतो. याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. मात्र, शेवटपर्यंत सांभाळून त्यांचा अंत्यविधी करण्याच्या घटना दुर्मिळ घडतात. अशीच एक घटना अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे घडली आहे. येथील शेतकर्याने लाडक्या लक्ष्या बैलाला ट्रॅक्टरमध्ये नेऊन सनईताशाच्या गजरात भावपूर्ण निरोप दिला.
ब्राह्मणवाडा येथील शेतकरी नारायण मुक्ताजी आरोटे यांनी सुमारे २२ वर्षांपूर्वी एक वर्ष वय असलेला लक्ष्या बैल घेतला होता. त्यानंतर कुटुंबातील सर्वच सदस्यांनी त्याचे लाड पुरवत सांभाळ केला. त्यानेही आपल्या मालकाला काहीही कमी पडू दिले नाही. राजबिंडा, चकाकी आणि चपळाई असलेला लक्ष्या क्षणार्धात कोणाचेही लक्ष वेधून घ्यायचा. त्याने पहिल्याच वर्षी खंडोबारायाच्या यात्रेतील शर्यतीत चुणूक दाखवली होती. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. अहमदनगर, पुणे, नाशिक जिल्ह्यात लक्ष्याने शर्यतींमध्ये नाव कमावले.
त्यानंतर जुन्नर तालुक्यातील वडज गावचे प्रसिद्ध गाडामालक बबनराव चव्हाण यांच्या बैलांबरोबर त्याला जुंपण्यात आले तेव्हा देखील त्याने एक नंबरचीच बाजी मारली. मध्यंतरी आरोटे कुटुंबाने त्याची विक्री केली होती. मात्र, प्रेमापोटी पुन्हा त्याला जास्त रक्कम देऊन विकत घेतले. तेथून पुढे त्याने सलग दहा वर्ष विलास नारायण आरोटे यांना प्रसिद्ध गाडामालक म्हणून नावलौकिक मिळवून दिला. मात्र, वय झाल्याने लक्ष्या थकला आणि त्याने मालकाची कायमचीच साथ सोडली. मालकानेही त्याच्यावरील प्रेमापोटी सनईताशाच्या गजरात अंत्यविधी केला. यावेळी आरोटे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. तर गाडाशौकिन आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.