मालुंजा बुद्रुक येथे शेतकर्याची आत्महत्या
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील मालुंजा बुद्रुक येथे कर्जबाजारीपणास कंटाळून एका शेतकर्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक-भेर्डापूर रस्त्यावर असलेल्या वस्तीवर जालिंदर नानासाहेब बडाख (वय 39) हा तरुण शेतकरी अल्पभूधारक असून त्याने शेतीसाठी कर्ज काढले होते. शेतीत काहीच पिकत नसल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या जालिंदर बडाख याने काल पहाटे स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली. जालिंदर बडाख याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना याची कल्पना देण्यात आली. त्यानुसार मुख्य हवालदार हबीब पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, जालिंदर बडाख याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भावजय, पुतणी, चुलते, चुलती असा मोठा परिवार आहे.