रामेश्वरच्या यात्रेत बनावट खव्याचे पेढे! अन्न व औषध प्रशासनाचा छापा; धांदरफळमधून चारशे किलो खवा जप्त..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
केमिकलचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या मावा-मिठाईतून विषबाधा होवून अनेकांचे बळी जाण्याचा घटना वारंवार घडत असताना आता त्याचे लोण थेट संगमनेर तालुक्याच्या ग्रामीणभागातही पोहोचले आहे. त्याचा प्रत्यय आज महाशिवरात्रीच्या दिनी आला असून अहिल्यानगरच्या अन्न व औषध प्रशासनाने धांदरफळमध्ये घातलेल्या छाप्यात तब्बल सव्वा लाख रुपये किंमतीचा चारशे किलो बनावट खवा जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे हजारों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रामेश्वर महाराजांच्या यात्रेत या खव्यापासून तयार केलेली बर्फी, केक आणि पेढ्यांची विक्री सुरु होती.

याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज शिवरात्रीच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवमंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रसाद म्हणून मोठ्या प्रमाणात विक्री होणार्या दूधापासूनच्या पदार्थावर विभागाची करडी नजर होती. प्रशासनाचे एक पथक तालुक्यातील विविध मंदिरांच्या परिसरात विक्री होत असलेल्या प्रसादाची पडताळणी करीत असतानाच धांदरफळ येथील रामेश्वर मंदिराच्या परिसरात बनावट खव्यापासून तयार झालेली बर्फी, पेढा व केक विक्री होत असल्याची गोपनीय माहिती विभागाला समजली.

त्यानुसार सहाय्यक आयुक्त सोपान इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बढे, प्रदीप पवारनमूना सहाय्यक सागर शेवंते व शुभम भस्मे यांनी यात्रेत जावून संबंधित दुकानदाराकडील मालाची तपासणी केली असता त्यासाठी वापरलेला खवा बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने धांदरफळमधील संदीप काळे याच्या ठिकाणावर छापा घालून सुमारे एक लाख 11 हजार रुपये किंमतीचा गुजरातमधून आलेला चारशे किलो बनावट खवा जप्त करुन त्याची कायदेशीर विल्हेवाट लावली. या कारवाईने तालुक्यातील मिठाई व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

