समाजाने उपयुक्तता ओळखून वृत्तपत्रांना मदत करावी ः पाटील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सोळावे अधिवेशन यशस्वी
नायक वृत्तसेवा, नगर
प्रसार माध्यमांचा प्रभाव कमी झाला तर लोकशाही कमकुवत होईल. त्यामुळे समाजानेच माध्यमांची उपयुक्तता ओळखून वृत्तपत्रांना मदत करावी. पत्रकारांनीही कोणाच्या सांगण्यावरून बातमी न देता खरी माहिती द्यावी, म्हणजे विश्वास वाढेल असे सांगून प्रबोधनाचे मार्केटिंग होणार नाही याची खबरदारी पत्रकारांनी घ्यावी असे आवाहन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सोळावे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे येथील गडकरी रंगायातन सभागृहात मंगळवारी (ता.28) दोन सत्रात प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. मागील दोन वर्षांपासून कोरोना जागतिक महामारीमुळे पत्रकार संघाचे राज्य अधिवेशन टाळण्यात आले होते. मात्र यंदा पत्रकार बांधवांच्या आग्रहाखातर कोरोना नियमांचे पालन करून हे अधिवेशन यशस्वीरित्या संपन्न झाले. कोरोना काळात वृत्तपत्र व पत्रकारांसमोर उद्भवलेल्या समस्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, ऑनलाइन चर्चा करून, संपादकांची गोलमेज परिषद घेवून तसेच विभागीय अधिवेशनाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी बारकाईने अभ्यास केला. त्यामुळेच या अधिवेशनात दोन्ही सत्रात वृत्तपत्रसृष्टी समोरील समस्या व उपायांवर चर्चा होऊन भविष्यात सकारात्मक कार्य करण्याची ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थित पत्रकार बांधवांनी वक्त केली.
उद्घाटन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सरचिटणीस विश्वास आरोटे, कार्याध्यक्ष राकेश टोळ्ये, मनीष केत, नितीन जाधव यांच्यासह सर्व विभागीय अध्यक्ष व राज्यभरातून पाचशेपेक्षा जास्त पत्रकार उपस्थित होते. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मराठी पत्रकारितेचा इतिहास आणि सध्याची परिस्थिती यावर नेमकेपणाने बोट ठेवले. पत्रकारांच्या हत्या आणि अटक याचा उल्लेख करत पत्रकारांसमोरील धोके स्पष्ट केले. लोकशाहीत पत्रकार हा चौथा खांब असल्याने लोकशाहीची इमारत मजबूत असल्याचे सांगितले. शेवटी राज्य पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक करून केंद्रीय स्तरावरील मागण्यांसाठी मदत करण्याची ग्वाही दिली. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकारांसमोरील समस्यांचा सविस्तर मागोवा घेतला. कोरोनानंतर प्रादेशिक वर्तमान पत्रांसमोरील आव्हाने मांडून त्यांनी वृत्तपत्रे आर्थिक पातळीवर आत्मनिर्भर होण्यासाठी स्वस्तात अंक विक्री करण्याचे पारंपरिक धोरण बदलावे आणि असे केले तरच या क्षेत्रात काम करणार्यांना रोजगाराचे स्थैर्य मिळेल, असे सांगितले. सरचिटणीस विश्वास आरोटे व कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे यांनी प्रास्ताविक करुन आभार मानले.