आता संगमनेर शहरालगतही पसरले घरफोड्यांचे लोण! वेल्हाळे शिवारातील चारचाकी वाहनांचे शोरुम फोडून सव्वा लाखांची रोकड लांबविली

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या महिन्यात तालुक्यातील कौठे कमळेश्वर शिवारातील दरोडा आणि खूनाची चर्चा अजूनही सुरू असताना आणि त्यालुक्यातील अन्यभागात दररोज छोट्या-मोठ्या चोरीच्या घटना समोर येत असतांना आता त्याचे लोण संगमनेर शहराच्या वेशीपर्यंत येवून थबकले आहे. आज पहाटेच्या सुमारास नाशिक महामार्गावरील एका चारचाकी वाहनांच्या शोरुमचा दरवाजा उघडीत दोघा चोरट्यांनी 1 लाख 20 हजार रुपयांची रोकडे घेवून पोबारा केला आहे. या वृत्ताने तालुक्यापाठोपाठ आता शहरातही चोरट्यांनी दहशत निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज (ता.5) पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दित असलेल्या वेल्हाळे शिवारातील हरिबाबा मंदिराजवळ शान कार्स अॅण्ड मोटर्स नावाचे मारुती सुझुकी कंपनीच्या चारचाकी वाहनांचे अलिशान दालन आणि सर्व्हिस सेंटर आहे. हेच दालन चोरट्यांनी लक्ष्य करीत पहाटेच्या सुमारास तेथे डल्ला मारला. सुरुवातीला दोघा चोरट्यांनी या दालनाचा काचेचा मुख्य दरवाजा उघडीत आत प्रवेश केला. त्यानंतर रोखापालच्या (कॅशिअर) कक्षाचा लाकडी दरवाजाही सहज उघडून त्यांनी कपाटात ठेवलेली एक लाख वीस हजार रुपयांची रोकड घेवून तेथून पोबारा केला.

सदरची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. पहाटे 2 वाजून 53 मिनिटांनी तोंड झाकलेले दोघे चोरटे दालनाच्या पूर्वेकडील बाजूचा काचेचा दरवाजा उघडून आत आले. त्यानंतर लागलीच त्यांनी रोखापालच्या कक्षाकडे जात तेथील लाकडी दरवाजाही तोडला आणि कपाटात ठेवलेली रोख रक्कम घेवून अवघ्या 25 मिनिटांतच 3 वाजून 18 मिनिटांनी तेथून पोबारा केला. ही संपूर्ण घटना दालनात सर्वत्र लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाली आहे.

विशेष म्हणजे या दालनाच्या सुरक्षिततेसाठी दिवस व रात्रपाळी अशा दोन्ही काळांसाठी सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. सदरची घटना घडली त्यावेळीही दालनाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात होता. मात्र चोरट्यांनी मुख्य मार्गाने आत न जाता सर्व्हिस सेंटरच्या बाजूने दालनात प्रवेश केल्याने सदरची बाब सुरक्षारक्षकाच्या लक्षात आली नाही. आज सकाळी सातच्या सुमारास तेथील सुरक्षारक्षक बाबासाहेब घुले यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी सदर दालनाचे मुख्य व्यवस्थापक मकरंद जोशी यांना कळविले. त्यांनी तातडीने आपल्या अन्यकाही सहकार्यांसह तेथे धाव घेतली असता आपल्या दालनात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याबाबत त्यांनी ताबडतोब पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबळे, रोहिदास मोळी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी व्यवस्थापक जोशी यांनी दालनातील सीसीटीव्हीचे फुटेजही पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यात दोघे चोरटे स्पष्ट दिसून येत आहेत. मात्र त्या दोघांनीही आपली तोंडे कापडाने झाकल्याने त्यांची ओळख स्पष्ट करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या प्रकरणी जोशी यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात भा.दं.वि. कलम 457, 380 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून घटनेचा तपास सहाय्यक निरीक्षक निकिता महाले यांच्याकडे सोपविला आहे. या घटनेने तालुक्यासह आता शहरातही चोरट्यांची भीती निर्माण होवू लागली आहे.

मारुती सुझुकी कंपनीच्या चारचाकी वाहनांचे दालन म्हणून प्रसिद्ध असलेल्या शान मोटर्समध्ये झालेली चोरी परिचिताने केली असावी असाही पोलिसांना संशय आहे. ज्या पद्धतीने चोरट्यांनी दालनात प्रवेश करण्यासाठी मागच्या बाजूचा अवलंब केला व थेट रोखापलचा कक्ष गाठला त्यावरुन या अंदाजला बळ मिळत आहे. त्यातच रोखापालच्या कक्षाचा दरवाजा तोडण्यात आल्याने त्याचा आवाज कसा बाहेर आला नाही हा देखील तपासाचा भाग ठरणार आहे. या घटनेने मात्र शहरातील व विशेष करुन शहरालगतच्या वसाहतींमध्ये राहणार्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

