पत्रकारांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रसंगी सरकारशी बोलणार : आ.विखे पा. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल करण्याची कृती निंदनीय असल्याचीही टीका..
नायक वृत्तसेवा, राहाता
साईबाबांची शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून जगाला परिचित आहे, त्यामुळे येथे दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या सुख-सुविधा आणि गैरसोयी मांडणं ही माध्यमांची भूमिकाच आहे. त्याचा विपर्यास करुन जर थेट संस्थानकडूनच माध्यमांच्या प्रतिनिधींवर गुन्हे दाखल होत असतील तर हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे, ज्याचा मनापासून निषेधच केला पाहिजे. अशा पद्धतीने दाखल झालेला गुन्हा त्वरीत मागे घेतला पाहिजे, त्यासाठी आपण संस्थानशी व गरज भासल्यास राज्य सरकारशीही बोलणार असल्याचे प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता येथे केले.
भाजपाच्यावतीने आज राज्यभर वीज वितरण कंपनी विरोधात ‘टाळे ठोको’ आंदोलन करण्यात आले. राहाता येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यासाठी विखे आपल्या कार्यकर्त्यांसह राहात्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या आदेशाने शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दोघा पत्रकारांवरील गुन्ह्याच्या प्रकरणावर भाष्य केले.
यावेळी पुढे बोलतांना विखे म्हणाले की, प्रसार माध्यमांचे वेगळे महत्त्व आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणूनच आपल्याकडे माध्यमांकडे पाहीले जाते. अशावेळी त्या भावना जागृत असणे आवश्यक असते. प्रसार माध्यमं समाजाचा आवाज व समस्या मांडत असतात. साईबाबा संस्थान हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे शिर्डीत येणार्या भक्तांच्या अडचणी, गैरसोयी मांडणं ही माध्यमांची भूमिकाच आहे. त्याचा विपर्यास करुन संस्थानकडूनच माध्यमांच्या प्रतिनिधींवर गुन्हे दाखल होणं ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे. व्यक्तिगत पातळीवर आपण या प्रकाराचा निषेध करीत आहोत. अशा प्रकारे दाखल झालेला गुन्हा त्वरीत मागे घेतला पाहिजे असा आपला आग्रह असून त्यासाठी संस्थानशी व गरज भासल्यास राज्य सरकारशीही बोलणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
सार्वजनिक पातळीवर काम करतांना अधिकार्यांनी सौजन्य आणि समन्वयाची भूमिका घेणे आवश्यक असते. नोव्हेंबरमध्ये घडलेल्या घटनेचा गुन्हा जानेवारीत दाखल करणं याचे कोणीही समर्थन करु शकत नाही. प्रशासन आणि माध्यमांचा योग्य समन्वय राहीला तर भाविकांच्या अडचणी दूर होण्यास मदतच होईल असे मतही विखे पाटील यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी व नितीन ओझा यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून राज्यभरातील पत्रकार संघटनांसह विविध पक्षांचे नेते, मंत्री, आमदार व खासदारांनी संस्थानच्या कार्यकारी अधिकार्यांच्या भूमिकेचा निषेध केला आहे. आज शिर्डीचे लोकप्रतिनिधी व राज्याचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या घटनेचा निषेध करीत परखड मत व्यक्त केले आहे.