राष्ट्रीय रोलर रिले स्पर्धेत ध्रुव ग्लोबलचे सुयश अठरा पदकांची कमाई; आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीही झाली निवड


नायक वृत्तसेवा, संगमनेर
छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या ३९ व्या राष्ट्रीय रोलर रिले चॅम्पियनशीप स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने सुयश प्राप्त केले. सहा ते बारा वयाच्या चार गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत ध्रुवच्या स्पर्धकांनी उत्तम प्रदर्शनाच्या जोरावर सहा सुवर्ण, नऊ रौप्य व तीन कांस्यपदकांसह एकूण १८ पदकांची कमाई केली. या स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन करणार्‍या ध्रुव ग्लोबलच्या सर्व स्पर्धकांची व्हिएतनाम येथे होणार्‍या सातव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीही निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेतील सहावर्षांखालील मुलींच्या गटात स्वरा ऋषीकेश वाघोलीकरने स्पीडरेस प्रकारात सुवर्ण तर, रिले एक व दोन प्रकारात अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकांची कमाई करताना ध्रुव ग्लोबल स्कूलच्या पदकांचे खाते उघडले. आठ वर्षांखालील मुलांच्या क्वाड प्रकारात वंश गौरव गांधी याने रिले एक व दोनमध्ये रौप्यपदक मिळवले. दहा वर्षांखालील मुलांच्या इनलाईन प्रकारात सर्वेश भाऊसाहेब जाधवने रिले एकमध्ये रौप्य व स्पीडरेसमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. याच वयोगटातील फॅन्सी इनलाईन प्रकारात श्रेयांश सचिन वाकचौरे याने स्पीडरेस आणि रिले दोन प्रकारात सुवर्णपदकासह रिले एकमध्येही रौप्यपदक प्राप्त केले.

दहा वर्षांखालील मुलांच्या क्वॉड प्रकारात शौर्य अजय फटांगरे यानेही चमकदार कामगिरी करताना रिले एकमध्ये सुवर्ण व रिले दोनमध्ये रौप्यपदक मिळवताना ध्रुवच्या पदकांचा तक्ता अधिक उंचावर नेला. याच वयोगटात अथर्व नवनाथ देशमाने याने रिले एक व दोनमध्ये अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले. बारा वर्षांखालील इनलाईन प्रकारात सोहम संतोष मेहेरने स्पीडरेस आणि रिले एक प्रकारात सुवर्ण व रिले दोनमध्ये रौप्य तर, स्वरांश प्रसाद पवार याने रिले एक प्रकारात रौप्यपदक मिळवताना ध्रुवच्या यशाची पताका फडकावत ठेवली.

या संपूर्ण स्पर्धेत विविध चार गटांत व रोलर रिलेच्या वेगवेगळ्या प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर ध्रुव ग्लोबल स्कूलच्या स्पर्धकांनी सहा सुवर्ण, नऊ रौप्य व तीन कांस्यपदकांसह एकूण १८ पदके मिळवली. या स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणार्‍या ध्रुवच्या सर्व स्पर्धकांची व्हिएतनाम येथे होणार्‍या सातव्या आंतरराष्ट्रीय रोलर रिले स्पर्धेसाठीही निवड करण्यात आली आहे. शाळेचे क्रीडा प्रशिक्षक ज्ञानेश्वर भोत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हाईस चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Visits: 138 Today: 1 Total: 1583102

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *