पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गावरील चार स्थानके वगळली! अंतिम पाहणी व आखणी अहवालानुसार निर्णय; स्थानकांच्या बांधकामाचे प्रस्ताव मागवले
नायक वृत्तसेवा, संगमनेर
बहुचर्चीत पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु होण्यास अद्याप प्रतीक्षा आहे, मात्र महारेलने जाहीर केल्यानुसार प्रत्यक्ष काम सुरु झाल्यानंतर 1100 दिवसांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गाचा अंतिम पाहणी व आखणी अहवाल तयार करण्यात आला असून त्यातून एकूण चोवीस स्थानकातील चार स्थानके वगळण्यात आली आहे. त्यात संगमनेर तालुक्यातील जांबुत रेल्वेस्थानकाचा समावेश आहे. येत्या 5 एप्रिलपर्यंत स्थानकांच्या बांधकामाचे प्रस्तावही मागवण्यात आल्याने लवकरच पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे काम सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
पुणे व नाशिक या महानगरांना जोडणार्या रेल्वेमार्गासाठी गेल्या तीन दशकांपासून संघर्ष सुरू आहे. तो आता संपण्याची चिन्हे दिसू लागली असून राज्यापाठोपाठ केंद्राकडूनही या प्रकल्पाला मान्यता प्राप्त झाली आहे. मात्र या प्रकल्पाला अजूनही केंद्रीय मंत्रीमंडळाची अंतिम मान्यता मिळणे बाकी असल्याने प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. मात्र या प्रकल्पाबाबत केंद्र सरकारही सकारात्मक असल्याने येत्या काही दिवसांत त्याला अंतिम मान्यता मिळेल असे गृहीत धरुन महारेलने या दोन महानगरांदरम्यान येणार्या एकूण 24 स्थानकांची पाहणी करुन त्याचा अंतिम आराखडा तयार केला आहे.
त्यानुसार आता या मार्गावर केवळ 20 स्थानके असतील हे स्पष्ट झाले आहे. त्यात पुणे, हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, साकूर, अंभोरे, संगमनेर, निमोण, नांदूर शिंगोटे, सिन्नर, मुढारी, वडगाव पिंपळा व नाशिकरोड या स्थानकांचा समावेश असेल. यापूर्वी स्थानकांच्या यादीत असलेल्या पुण्यातील कोलवडी, अहमदनगर जिल्ह्यातील जांबुत, अकोले तालुक्यातील देवठाण व नाशिक जिल्ह्यातील दोडी ही स्थानके वगळण्यात आली आहेत.
महारेलला या मार्गाचा अंतिम पाहणी व आखणी आराखडा प्राप्त झाल्यानंतर आता या मार्गावरील एकूण 20 स्थानकांच्या बांधकामाची प्रक्रीया सुरु करण्यात आली असून त्यासाठी प्रस्तावही मागवण्यात आले आहेत, 5 एप्रिलपर्यंत याबाबतचे प्रस्ताव पाठविता येणार असून त्यानंतर प्रत्यक्ष स्थानकांचे काम सुरू होणार आहे. याशिवाय या कामांमध्ये स्थानकांच्या परिसराचे बांधकामासह पादचारी पुल व मार्ग आणि त्या अनुषंगाच्या इतर कामांनाही सुरुवात केली जाणार आहे. सध्या सदरच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या अंतिम मान्यतेची प्रतीक्षा आहे. ती लवकरच प्राप्त होईल अशी अपेक्षा नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी वर्तविली आहे.
एकूण 16 हजार 39 कोटी रुपयांच्या या रेल्वेमार्गासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी 20 टक्के रक्कम प्राप्त होणार आहे. उर्वरीत रक्कम खासगी क्षेत्रातून कर्जरुपाने उभी केली असून तोपर्यंत 10 हजार कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिलेली आहे. या प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प आराखड्यानुसार (डीपीआर) या रेल्वेमार्गासाठी एकूण 1 हजार 458 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातील 102 गावे बाधित होणार आहेत. त्यातील 85 गावांमधील जमिनीची मोजणीही पूर्ण करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रीमंडळाची अंतिम मान्यता मिळेल व लवकरच काम सुरू होईल असा विश्वास खासदार गोडसे यांनी व्यक्त केला आहे.
नव्याने झालेल्या पाहणी व आखणी अहवालानुसार पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गावर आता पुणे, हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, साकूर, अंभोरे, संगमनेर, निमोण, नांदूर शिंगोटे, सिन्नर, मुंढावे, वडगाव पिंपळी व नाशिकरोड स्थानकांचा समावेश असेल. 235 किलोमीटर अंतराचा हा रेल्वेमार्ग पुणे जिल्ह्यातून 113.10 किलोमीटर, अहमदनगर जिल्ह्यातून 58 किलोमीटर तर नाशिक जिल्ह्यातून 64.05 किलोमीटर असणार आहे.