लेखी आश्वासनानंतर मुथाळणे ग्रामस्थांचे उपोषण मागे! आवळा कंपनी व खडी क्रेशला परस्पर ‘ना हरकत’ दाखला दिल्याचे प्रकरण

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील मुथाळणे येथील कुंडाचीवाडी मधील आवळा कंपनी व पागिरवाडी येथील खडी क्रेशरला ग्रामपंचायतने ‘ना हरकत’ दाखला स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व काही ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर संगनमत करुन दिला. याबाबत विस्तार अधिकार्यांनी दिलेल्या अहवालावर योग्य कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थ सोमवारी (ता.2) तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते. याची गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांनी दखल घेत विस्तार अधिकार्यांनी दिलेल्या अहवालानुसार संबंधित दोषी व ग्रामसेवक यांच्यावर दहा दिवसांत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले, त्यानंतर उपोषण मागे घेतले.

मुथाळणे ग्रामस्थांच्या मागणीनंतर गटविकास अधिकार्यांनी विस्तार अधिकार्यांना चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्या अहवालात ग्रामपंचायत दप्तरातील अनियमितता समोर आली आहे. या अहवालानुसार संजय फरगडे यांनी 12 जानेवारी, 2020 च्या अंदाजानुसार गट क्रमांक 600 मध्ये साई सिद्धी स्टोन क्रेशरला परवानगी मागितली होती. यासाठी 22 जानेवारी रोजी मासिक सभा घेण्यात आली. या सभेला सरपंच, उपसरपंचासह चार सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या नऊ सदस्यांना पाठविलेल्या अजिंठ्यात याबाबतचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नव्हता.
![]()
विषय क्रमांक 8 नुसार आलेल्या अर्जावरून प्रत्यक्षात गट क्रमांक 649 मध्ये अटी आणि शर्तींना अधीन राहून ‘ना हरकत’ दाखला देण्यात आला. तसेच ना हरकत दाखल्यावर जावक क्रमांक नसून मासिक सभेची तारीख 21 जानेवारी लिहिलेली आहे. अशाप्रकारे ग्रामपंचायत दप्तरात चुका करून चुकीचा ‘ना हरकत’ दाखला देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आवळा कंपनीसाठी गट क्रमांक 374/1 व 2 मध्ये ना हरकत दाखला मागण्यात आला. ग्रामपंचायतकडे ना हरकत दाखला मागताना उद्योग व्यवसायासाठी आवश्यक शासकीय परवान्याच्या प्रती जोडलेल्या नाहीत. तसेच ना हरकत प्रमाणपत्रावर जावक क्रमांक नाही आणि ग्रामसेवकांना याबाबत नोटीस देऊनही त्यांनी खुलासा सादर केलेला नाही.
