जिल्ह्यात करोनाचे नियम मोडल्याचे 26 हजार गुन्हे!

नायक वृत्तसेवा, नगर
करोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अपघात तसेच इतर गुन्हे गंभीर गुन्हे कमी झाल्याचे आढळून आले, असे असले तरी अहमदनगर जिल्ह्यात उलटे चित्र आहे. अन्य गुन्हे कमी झाले असले तरी करोनासंबंधीचे नियम मोडल्याचे तब्बल 26 हजार गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण गुन्ह्यांच्या संख्येत चौपटीने वाढ झाली आहे. करोनाचे आकडे कमी होत असल्याने त्यासंबंधीचा पोलिसांवरील ताण कमी होत असला तरी दाखल 26 हजार गुन्ह्यांचा निपटारा करण्याचे काम आता पोलिसांना लागले आहे.


गेल्या वर्षी मार्चच्या शेवटच्या टप्प्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. कडक लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरील वावर कमी झाल्याने अपघात, खून, दरोडे, जबरी चोर्‍या, घरफोड्या असे गुन्हे कमालीचे घटले होते. करोनासंबंधी करण्यात आलेले नियम मोडल्याचे गुन्हे पोलिसांकडून दाखल केले जात होते. लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यावर त्यात आणखी वाढ झाली. अहमदनगर जिल्ह्यात आत्तापर्यंत सुमारे 26 हजार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. राज्यात ही संख्या सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येते. मास्कचा वापर न करणे, सोशल डिन्स्टन्स न पाळणार्‍या, संचारबंदी असताना बाहेर फिरणे, बनावट पासद्वारे फिरणे, दुचाकीवर केवळ एकच व्यक्ती, चार चाकीमध्ये तीनच व्यक्ती, दुकान वेळेआधी न उघडणे, वेळ संपली तरी सुरू न ठेवणे असे विविध नियम केले गेले होते. या नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्ती, दुकानदार-व्यावसायिक, संस्थांशी संबंधितांवर मुंबई पोलीस अ‍ॅक्ट 188 नुसार विविध पोलीस ठाण्यांतून गुन्हे दाखल करण्यात आले. दुचाकी व चारचाकी वाहनेही जप्त केली गेली गेली. अशा प्रकारचे कायद्याचे उल्लंघन करणारांविरुद्ध हे 26 हजार 700 गुन्हे दाखल आहेत. आता या प्रत्येक गुन्ह्याचे स्वतंत्र दोषारोपपत्र तयार करून ते न्यायालयात पाठवावे लागणार आहे. यामुळे 2019 वर्षाच्या तुलनेत 2020 मध्ये जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यांची संख्या सुमारे चौपट झाली. 2019 मध्ये जिल्ह्यात सर्व प्रकारचे एकूण गुन्हे 11 हजार 195 दाखल होते. आता 2020 मध्ये 43 हजार 797 गुन्हे दाखल झाले आहेत. जिल्ह्यात दाखल गुन्ह्यांपैकी 69 टक्के गुन्हे उघडकीस आले असून, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण 77 टक्के आहे.

Visits: 50 Today: 1 Total: 431479

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *