साडेतीन हजार नागरिकांच्या रक्षणासाठी अवघा एक पोलीस! घारगाव पोलीस ठाण्याची सद्यस्थिती; उपलब्ध मनुष्यबळावरही गुन्हेगारी नियंत्रित

नायक वृत्तसेवा, घारगाव
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याशी प्रामाणिक राहून कर्तव्यापासून तसूभरही न हटता ‘पोलीस’ तीनही ऋतूंमध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्य निभावतात. वेळप्रसंगी जीवावर उदार होवून कुटुंबाचाही क्षणभर विचार न करता जीवाची बाजी लावण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. कमी मनुष्यबळ असतानाही अहमदनगर जिल्हा पोलीस विभागातील घारगाव पोलीस ठाणे याचीच प्रचिती देत आहेत. सत्तर ते ऐंशी हजार लोकसंख्येसाठी घारगाव पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु, साडेतीन हजार नागरिकांच्या संरक्षणासाठी अवघा एक पोलीस कर्मचारी कर्तव्य निभावत असल्याचे दृश्य आहे. अवघ्या चोवीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बळावर सत्तेचाळीस गावांची कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम चोखपणे पार पाडत आहेत.

भौगोलिकदृष्ट्या संगमनेर तालुक्याचा विस्तार मोठा असल्याने संगमनेर शहर, तालुका, आश्वी व घारगाव पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. सध्या घारगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक एक, उपनिरीक्षक एक, मुख्य हवालदार सात, पोलीस नाईक सहा, पोलीस शिपाई अकरा असे मिळूण चोवीस अधिकारी व कर्मचारी भार सांभाळत आहेत. त्यात पठारभागातील अनेक गावे वाड्या-वस्त्यांवर विखुरलेली आहेत. रस्त्यांची तर अतिशय दयनीय अवस्था आहे. गुन्ह्यांचा आलेखही कमी-जास्त होत असतो. यासाठी एकतीस मनुष्यबळ मंजूर असताना अवघे चोवीस संख्याबळ उपलब्ध आहेत. तरी देखील तीनही ऋतुंमध्ये घारगाव पोलीस ठाणे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी वेळप्रसंगी चोवीस तास कर्तव्य निभावत आहेत.

सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळात एक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक धिरज राऊत, दोन चालक, दोन सुरक्षारक्षक, एक न्यायालय, एक गोपनीय, एक फाईल, एक कंपनी, दोन रायटर, एक कारकून, एक बारनिशी, एक अ‍ॅडमिन आणि एक समन्स अथवा वॉरंटसाठी नियुक्त आहेत. त्यांच्या हद्दीमध्ये सुमारे ऐंशी हजार लोकसंख्या असलेली 47 गावे येतात. त्यांचे संरक्षण करण्याची आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी अवघ्या 24 अधिकारी व कर्मचार्‍यांना पार पाडावी लागत आहे. यामध्ये गुन्ह्यांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. विशेष म्हणजे त्यांच्याच हद्दीतून पुणे-नाशिक महामार्ग जात असल्याने अपघातांचे गुन्हेही नियंत्रित करावे लागतात.


त्यामुळे जिल्हा पोलीस दलाने याची दखल घेऊन विस्तीर्ण असलेल्या पठारभागातील घारगाव पोलीस ठाण्यासाठी मंजूर पदांची लवकरात लवकरात नियुक्ती करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे. यामुळे उपलब्ध मनुष्यबळावरील ताण-तणाव कमी होईल. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे सोपे होवून आणि कायदा-सुव्यवस्था व्यवस्थितरित्या हाताळण्यास मदत होईल.

गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी खंदरमाळवाडी शिवारात एका इसमाचा खून झाल्याची घटना घडली होती. याचा घारगाव पोलिसांनी अवघ्या दोन-तीन तासांत छडा लावून आरोपीस बेड्या ठोकल्या. यावरुन येथील पोलीसबळ कोणतीही सबब पुढे न करता इमाने-इतबारे कर्तव्य निभावत असल्यानेच लोकांच्या कौतुकास पात्र ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *