शेततळ्यावर गेलेल्या तरुण जोडप्याचा बुडून मृत्यू आंचगावमधील घटना; कोपरगाव तालुक्यावर पसरली शोककळा

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
वीज नव्हती म्हणून जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या तरुण जोडप्याचा तळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील आंचलगावमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. पूजा नीलेश शिंदे (वय 22) आणि नीलेश रावसाहेब शिंदे (वय 27) अशी त्यांची नावे आहेत. वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.

यासंबंधीची अधिक माहिती अशी की, मंगळवारी (ता.8) सायंकाळी आचलगाव परिसरात वीज नव्हती. त्यामुळे पंप सुरू करून जनावरांच्या पाण्याची व्यवस्था करणे शक्य नव्हते. सायंकाळपर्यंत प्रतीक्षा करूनही वीज न आल्याने पूजा व नीलेश शिंदे यांनी आपल्या शेतातील तळ्यातून पाणी आणण्याचा निर्णय घेताला. त्यासाठी दोघेही तळ्यावर गेले. शेततळ्याला प्लास्टिकचा कागद असतो. पाणी काढताना ते घसरून आत पडले असावेत. बराच काळ झाला, ते परत न आल्याने शोधाशोध सुरू झाली.

या प्रकाराची माहिती मिळताच कोपरगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे सहकार्यांसह घटनास्थळी आले. शेततळ्यातील पाणी कमी करून ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेऊन दोघांना बाहेर काढण्यात आले. त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
