विद्युत सहाय्यक भरती प्रक्रिया पारदर्शक होईल ः तनपुरे उमेदवारांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करुन केले शंका निरसन
नायक वृत्तसेवा, राहुरी
विद्युत सहाय्यक भरती प्रक्रियेत कुणावरही अन्याय होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. भरती पारदर्शक पद्धतीने करण्याची दक्षता घेतली आहे, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
याविषयी राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, ‘तीन दिवसांपूर्वी विद्युत सहाय्यक पदाची यादी जाहीर झाली. त्यात उमेदवारांचा यादीतील काही मुद्द्यांवर आक्षेप होता. काही बाबतीत संभ्रमाचे वातावरण होते. त्यासाठी मुंबई येथे उमेदवारांच्या काही प्रतिनिधींबरोबर चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर झाली, म्हणजे अंतिम नियुक्ती दिली असे नाही.’
जाहिरात देताना ज्या गोष्टींचे निकष लावले आहेत, त्या सर्व गोष्टींचे तंतोतंत पालन केले जाईल. मग ते बेस्ट ऑफ फाईव्ह असो, शैक्षणिक पात्रतेचे निकष असो किंवा अन्य काही निकष. नियुक्ती देण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी केली जाते. कागदपत्रे पडताळणी करताना जाहिरातीतील निकषांची पूर्तता न करणारे अर्ज प्रक्रियेतून बाद केले जातील. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही. त्यावर शंका घेऊ नये. पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबवण्यात येईल, असा विश्वास राज्यमंत्री तनपुरे यांनी दिला.