माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या दूरदृष्टीतून तालुक्यात जलसमृद्धी! गावागावात जल्लोष; जलपूजन, मिरवणुका आणि आनंदोत्सव
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सतत पाठपुरावा करून निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले आणि आता निळवंडे धरणाचे पाणी डावा आणि उजवा कालव्यांमार्फत शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले त्यामुळे संपूर्ण तालुक्यात जल्लोषाचे, आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले. या यशामागे दूरदृष्टी असलेले माजी मंत्री थोरात यांचे नेतृत्व असल्याने दुष्काळी गावे आता पाणीदार होवू लागली आहेत.
निळवंडे धरणाच्या पाण्याची स्वप्नपूर्ती झाल्याने शेतकऱ्यांच्या वतीने गावागावांमध्ये ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका, फटाक्यांची आतषबाजी आणि जलपूजनाचे कार्यक्रम होत असून हा उत्सव म्हणजे केवळ जलपूजन नव्हे, तर एका स्वप्नपूर्तीचा साक्षात साक्षात्कार आहे. त्यामुळे आता दुष्काळ पिडीत शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण होणार आहे.

बाळासाहेब थोरात यांनी मंत्री असताना विकासाचा आणि विशेषतः पाणी प्रकल्पांचा जो ध्यास घेतला, त्यातूनच निळवंडे धरण तसेच त्याला जोडलेले डावा आणि उजवा कालवे पूर्णत्वास गेले. या कार्यासाठी त्यांनी आमदारकी आणि मंत्रीपदाचीही तमा न बाळगता अविरत संघर्ष केला. त्यांच्या नेतृत्वामुळे आज दुष्काळी भागात पाणी पोहोचले असून, शेतकऱ्यांच्या आयुष्यात खराखुरा आनंद आला आहे.

तालुक्यातील अंभोरे, पानोडी, मालुंजे, पिंपरणे, चिंचोली गुरव, वरझडी, कासारे, लोहारे देवकौठे, मिरपुर, हिवरगाव पावसा, निमगाव टेंभी, देवगाव, वाघापूर, खराडी आदी गावांमध्ये जलपूजनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. शेतकऱ्यांनी काळ्या आईच्या पोटात पाणी आल्याने आनंद व्यक्त केला. मिरवणुका, फटाके, ढोल-ताशा या साऱ्या गोष्टींनी संपूर्ण परिसर न्हावुन निघाला.

उजव्या कालव्या लगतच्या गावांना जलसिंचनाची सुविधा मिळावी, यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून व बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने सुमारे २ कोटी रुपये खर्चून पाईप बसवण्यात आले. या पाईपद्वारे कालव्याचे पाणी विविध बंधाऱ्यांमध्ये पोहोचवले गेले. परिणामी गावागावात जलपूजनाचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. हिवरगाव पावसा व घुलेवाडी येथे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडलेल्या जलपूजन सोहळ्याला हजारोंच्या संख्येने ग्रामस्थांनी हजेरी लावली. ढोल-ताशांमध्ये निळवंडेच्या पाण्याचे स्वागत करण्यात आले.यावेळी बोलतांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, निळवंडेचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आल्याने स्वप्नपूर्ती झाली आहे मात्र कालव्यांच्या वरच्या बाजूला जे शेतकरी आहेत, त्यांच्या करता ही पाणी देण्यासाठी आराखडा केला आहे. सत्ता असो अथवा नसो तरीही या पुढील काळात या शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी आपला पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील १८२ गावांमध्ये आणि तळेगाव गटातील दुष्काळी भागांमध्ये निळवंडे धरणाचे पाणी पोहोचावे यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी धरणासह उजवा व डावा कालवा पूर्णत्वास नेला. त्यांच्या अथक प्रयत्नातून आज या कालव्यांमधून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचले असून, हे एक प्रकारचे कार्यसिद्धीचे उदाहरण आहे. अजूनही ज्या शेतकऱ्यांना पाणी मिळालेले नाही, त्यांच्या साठी आराखडा तयार करण्यात आला असून पुढील टप्प्यात कामे हाती घेतली जाणार आहेत. तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळावे, हा त्यांचा संकल्प होता. सत्ता बदलल्याने काही अडथळे निर्माण झाले, तरीही थोरात सातत्याने पाठपुरावा करत आहेत. राज्यातील सर्वच मंत्र्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याने विकासकामांमध्ये अडथळा येणार नाही असा विश्वास सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक इंद्रजीत थोरात यांनी व्यक्त केला.

