पिंपळवाडीमध्ये कोरोनाचा उच्छाद; गाव बुधवारपासून ‘लॉकडाऊन’! गेल्या दहा दिवसांत सोळाहून अधिक कोरोनाबाधित तर एकाचा बळी

नायक वृत्तसेवा, राहाता
सरकारी आरोग्य यंत्रणा कोविड लसीकरणात मग्न असताना, शिर्डी शहरालगतच्या पिंपळवाडी येथे कोविडने उच्छाद मांडला आहे. चार हजार लोकसंख्येच्या या गावात गेल्या 10 दिवसांत बाधितांची संख्या 16 हून अधिक झाली आहे. त्यात एकाचा बळी गेला आहे. त्यामुळे बुधवारी (ता.27) मध्यरात्रीपासून गावात तीन दिवस लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.

दरम्यान, येथील रहिवाशांचा शिर्डीशी नित्याचा संपर्क असतो. त्यात गेल्या 10 दिवसांत येथे तातडीने रॅपिड अँटिजेन चाचण्या करून संसर्ग नियंत्रित ठेवणे गरजेचे होते. मात्र, सध्या तालुक्यात किट शिल्लक नाहीत. अंगणवाडी सेविकांद्वारे घरोघरी जाऊन थंडी-तापाचे रुग्ण शोधण्याचे काम सुरू आहे. सरकारी यंत्रणेने येथील परिस्थिती फारशी गांभीर्याने घेतली नाही. रुग्णसंख्या वाढू लागल्याने अखेर बुधवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे.

राहाता तालुक्यातून कोविडने जवळपास गाशा गुंडाळला होता. साईसंस्थानच्या कोविड रुग्णालयात अवघ्या चार रुग्णांवर उपचार सुरू होते. सरकारी आरोग्य यंत्रणा काहीशी सुस्तावलेली असताना, पिंपळवाडीत अचानक बाधितांची संख्या वाढू लागली. सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. गागरे यांच्या माहितीनुसार 14 रुग्ण आहेत. नाशिक येथील खासगी रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. 13 पैकी 10 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेऊन परतले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के यांच्याकडे येथे 16 रुग्ण असल्याची माहिती आहे. थंडी-तापाचे रुग्ण शोधणार्‍या अंगणवाडी सेविकांच्या माहितीनुसार रुग्णसंख्या 22 वर पोहोचली आहे.

याबाबत माजी सरपंच वाल्मिक तुरकणे म्हणाले, कोविड संसर्ग रोखण्यासाठी तातडीने अँटिजेन चाचण्या करणे गरजेचे आहे. सरकारी यंत्रणेने बाधितांच्या संपर्कात आलेल्या अडीचशेहून अधिक रुग्णांना थंडी-ताप आला का, याची तपासणी अंगणवाडी सेविकांद्वारे केली. मात्र, त्यामुळे संसर्ग रोखला जाणार नाही. रॅपिड व गरज असेल तेथे आरटीपीसीआर चाचणी करून संसर्ग रोखण्यासाठी युद्ध पातळीवर हालचाली करणे गरजेचे आहे.

पिंपळवाडी ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक झाली. घरोघरी जाऊन प्रचार, वाड्या-वस्त्यांवरील सभा व बैठकांमुळे संसर्ग फैलावला. निवडणुकीत ‘गणेश’चे माजी संचालक उमाकांत तुरकणे यांचे मंडळ विजयी झाले. मात्र, दुर्दैवाने कोविड संसर्गात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. सत्ताधारी मंडळ त्यांना 6 जागा बिनविरोध द्यायला तयार होते. निवडणूक निकालानंतर त्यांच्या मंडळाला खरोखर तेवढ्याच जागा मिळाल्या. सत्ता ताब्यात आली; मात्र हा विजय पाहायला ते आता हयात नाहीत.

Visits: 157 Today: 3 Total: 1111864

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *