‘जिल्हा बँक’ ही राजकीय पक्षांनी धुडगूस घालण्याची संस्था नाही! ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी सहकारातील नेत्यांचे उपटले कान

नायक वृत्तसेवा, नेवासा
जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू म्हणून ओळख असलेल्या जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक सुरू झाली आहे. जिल्हा बँक ही काही राजकीय पक्षांनी धुडगूस घालण्याची संस्था नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी फटकारले. बँकेच्या आर्थिक स्थितीवरुन आणि सध्या सुरू असलेल्या राजकीय साठमारीमुळे ज्येष्ठ नेते गडाख व्यतीत झाले आहे. त्यांनी सहकारातील नेत्यांचे कान उपटताना वडीलकीचा सल्लाही दिला आहे.
![]()
पत्रकारांशी बोलताना गडाख म्हणाले, ही जिल्हा बँक आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रगतीपथावर ठेवण्याचा प्रयत्न स्वर्गीय मोतिभाऊ फिरोदिया, भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले या दिवंगत नेत्यांसह आमच्या पिढीने केला. सगळ्या ग्रामीण भागाचे अर्थकारण, साखर कारखाने, सेवा सोसायट्या जिल्हा बँकेवर पूर्णत: अवलंबून आहेत. गेल्या तीन वर्षामध्ये जिल्हा बँकेवर बेकायदेशीर नोकर भरतीसह अनेक आरोप झाले. त्याचबरोबर जवळ जवळ शंभर कोटी रुपये राहुरी साखर कारखान्याकडे थकले आहेत. ते वसूल होतील की नाही हे माहीत नाही. अनुउत्पादित कर्जाचे (एनपीए) प्रमाण खूप वाढलेले आहे, ही चिंताजनक बाब आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. अशा अवस्थेत बँकेकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी अपेक्षाही गडाख यांनी व्यक्त केली आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मोठे पण त्यांचेही जिल्हा बँकेकडे लक्ष नाही. त्यामुळे खर्या अर्थाने मातृसंस्था व कामधेनू असलेली जिल्हा बँक बुडाली तर जिल्ह्यातील साखर कारखाने सेवा सोसायट्या आणि हजारो शेतकर्यांचे प्रपंच उघड्यावर पडतील. त्यामुळे त्यांनी यात लक्ष घालावे. तसेच पक्षीय राजकारण विरहीत बँक सांभाळणारे सक्षम उमेदवार द्यावेत व बँक सांभाळणारा सक्षम अध्यक्ष द्यावा. तरच बँकेचे भवितव्य ठीक राहील, असा वडीलकीचा सल्लाही ज्येष्ठ नेते गडाख यांनी दिला.
