जुन्या नाशिक-पुणे महामार्गाने घेतला मोकळा श्वास! ‘नायक’ च्या वृत्तानंतर रस्त्यावरच्या कमानी हटवल्या

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहराच्या मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेल्या अवाढव्य कमानींमुळे नागरिक आणि वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याचे वास्तव  ‘दैनिक नायक’ ने प्रखरपणे मांडत यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तानंतर संबंधितांनी तातडीने कार्यवाही करत मुख्य रस्त्यावर उभारलेल्या सर्व कमानी रात्रीतून हटवल्या. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक-पुणे महामार्गाने मोकळा श्वास घेतला आहे.
गेल्या सात-आठ महिन्यापासून शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचवणाऱ्या फलक, बॅनर आणि अवाढव्य कमानींमुळे शहराचे विद्रूपीकरण सुरू आहे. काही राजकीय पक्षात आणि पदाधिकाऱ्यात जणू हे बॅनर आणि कमानी लावण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. आणि त्यातून
बसस्थानक परिसरातील मुख्य चौक, प्रमुख रस्ते, शाळा-काॅलेजांच्या परिसर, तसेच  महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक पावलावर फ्लेक्स, बॅनरांची गर्दी  झाली होती. त्यामुळे शहरभर लावण्यात येणारे मोठमोठे बॅनर व कमानी नागरिकांच्या डोक्याचा ताप बनले होते. परिणामी रस्ते अरुंद होऊन त्याचा रहदारीवर गंभीर परिणाम होत असताना संबंधित मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकात संताप व्यक्त होत होता.
शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक-पुणे महामार्गाला तर कमानींचा वेढा पडला होता.जागोजागी उभारण्यात आलेल्या भल्या मोठ्या कमानींमुळे दररोज सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी शहरात वाहनांची प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. गर्दीच्या वेळी कमानींमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात होती.सायकलस्वार, दुचाकीस्वार, शाळकरी मुले व पादचारी यांना रस्त्यांवरून जाणे अवघड झाले होते. याबाबत दैनिक ‘नायक’ ने शुक्रवार दि.१२ सप्टेंबर रोजीच्या अंकातून आवाज उठवला, त्यामुळे संबंधितांनी महामार्गावरील कमानी तात्काळ हटवण्याचे औदार्य दाखवले आणि रात्रीतून या कमानी काढून घेतल्या.
त्यामुळे अनेक दिवसांपासून विस्कळीत झालेली वाहतूक काही प्रमाणात  सुरळीत झाली असून, मुख्य रस्ता पुन्हा एकदा मोकळा झाल्याने नागरिक व वाहनधारकांनी ‘दैनिक नायक’ चे आभार मानले आहेत.
सार्वजनिक रस्ते हे लोकांसाठी आहेत. ते शोभेच्या कमानींनी अडवले जाणे चुकीचे आहे.’नायक’ ने हा मुद्दा मांडल्याने आज आम्हाला मोकळा श्वास घेता आला, अशा प्रतिक्रिया सुजाण नागरिकांनी दिल्या असून शहराच्या विद्रूपीकरणाला आणि वाहतुकीला कारणीभूत असलेल्या कमानी काढल्या असल्या तरी जागोजागी असणारे फ्लेक्स मात्र अजूनही तसेच आहेत. त्यामुळे हे फ्लेक्स तातडीने काढण्यात यावेत आणि यापुढे अशा कमानी आणि फ्लेक्सला पालिकेने परवानगी देऊ नये अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
Visits: 196 Today: 1 Total: 1598294

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *