जुन्या दहेगाव रस्त्याचे काम निकृष्ट ग्रामस्थांची सखोल चौकशीची मागणी
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील संवत्सर दशरथवाडी हद्दीतील जुन्या दहेगाव रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून संबंधित ठेकेदाराचे कुठलेही बिल अदा करु नये. त्याचबरोबर सदर रस्त्याच्या कामकाजाची देखील त्वरीत सखोल चौकशी करावी, अशी मागणी संवत्सर ग्रामपंचायतचे सदस्य महेश परजणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संवत्सर दशरथवाडी हद्दीतील जुन्या दहेगाव रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे रस्ता हा उच्च दर्जा तथा गुणवत्तेचा होणे गरजेचे असताना तसे कुठेही झाले नाही. सध्या या रस्त्याचे कामकाज सुरू असताना प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ठेकेदाराने त्याचा फायदा घेतला आहे. सर्व नियम तोडून रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्याचे तीन तेरा वाजले आहे. यामुळे कामाच्या दर्जाबाबत व गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची त्वरीत चौकशी करुन ठेकेदारावर कारवाई करावी. अन्यथा, प्रशासनाच्या विरुद्ध उपोषण करण्यात येईल असा इशारा संवत्सर ग्रामपंचायतचे सदस्य महेश परजणे, ज्ञानेश्वर परजणे, नामदेव सोनवणे, रणजीत जगताप, मुकुंद काळे, संभाजी भाकरे, सिद्धार्थ भालेराव आदिंसह ग्रामस्थांनी दिला आहे.