दिव्यांगांना समाजाच्या प्रवाहात आणणारे आपण सैनिक आहोत ः आ.डॉ.तांबे राज्यस्तरीय कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आज खर्या अर्थाने महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील दिव्यांगांच्या ऑनलाइन नृत्य स्पर्धेचा हा आगळावेगळा प्रयोग संग्राम निवासी मूकबधीर विद्यालयातील पथकाने करून दाखविला आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी दाखवून दिले की ही एक स्पर्धा नसून एक सांस्कृतिक महोत्सव आहे. सुप्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी ‘अजिंक्य मी अभंग मी’ हे नाव महोत्सवाला दिले आहे. आणि हे ब्रीदवाक्य आज या कर्णबधीर दिव्यांग विद्यार्थ्यांनी सार्थक करून दाखवले आहे. कोणी यांना जिंकू शकत नाही व ही कधीही न भंगणारी अभंग अशी आहेत. ह्याच उत्साहाने सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, नृत्य दिग्दर्शक व सर्व तंत्रज्ञांनी उत्स्फूर्त सहभाग व प्रतिसाद दिला. यावरुन या दिव्यांगांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणारे आपण सैनिक आहोत असे प्रतिपादन आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले.
दिव्यांग ऑनलाइन नृत्य स्पर्धेचे आयोजन लायन्स क्लब ऑफ संगमनेर, जिल्हा समाज कल्याण कार्यालय अहमदनगर, संग्राम निवासी मूकबधीर विद्यालय व डॉक्टर देवेंद्र ओहरा निवासी मतिमंद विद्यालय संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून 25 संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कोविड संसर्गामुळे शाळा बंद असूनही काही स्पर्धकांनी आपल्या घरून तर काही स्पर्धकांनी शाळेतून ऑनलाइन नृत्याचे सादरीकरण केले.
या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र कलाभूषण रघुवीर खेडकर, सुप्रसिद्ध सिनेतारका मंदा खेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सह्याद्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. पाटील उपस्थित होते. तर सह्याद्री कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम. वाय. दिघे, एल. आय. सी.चे आर. एच. लगे, संजय करंदीकर, संग्राम संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत शिंदे, लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या सदस्या बबीता आसावा, सौ.शहा उपस्थित होते.
यावेळी बोलताना रघुवीर खेडकर म्हणाले, आपण कोरोनाच्या काळात या ऑनलाइन वैयक्तिक नृत्य स्पर्धा घेऊन या मुलांचा न्यूनगंड कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या मुलांना दया दाखवण्यापेक्षा आपण त्यांना संधी उपलब्ध करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी मला कधीही हाक द्या मी सदैव तयार आहे. प्राचार्य डॉ.पाटील म्हणाले, आयोजकांनी ऑनलाईन नृत्य स्पर्धा घेऊन एक आगळावेगळा प्रयोग केला आहे. यातून दिव्यांगांना शिक्षणाची संधी निश्चितपणे उपलब्ध झाल्याशिवाय राहणार नाही. 25 संघ ऑनलाईन एकमेकांना जोडून स्पर्धा घेणे ही साधी बाब नाही. इथून पुढे शैक्षणिक स्पर्धा या संघांना घेता येतील.
ललित देसाई यांनी आयोजकांना धन्यवाद देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तसेच विजेत्यां संघांना गुगल पे व फोन पेच्या माध्यमातून बक्षिसाची रक्कम पाहुण्यांच्या हस्ते अदा करण्यात आली. सहभागी संघांना व विजेत्या संघांना कुरियरच्या माध्यमातून प्रमाणपत्र पाठवली जाणार आहे. ऑनलाइन नृत्य स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून प्रा.घायवट व रंजना पवार यांनी काम पहिले तर तंत्रज्ञ म्हणून संजय मासाळ, आनंद अल्ले व रावसाहेब पगारे यांनी काम केले. प्रास्ताविक मूकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय. डी. देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन अर्चना मुन्तोडे व सुनील कवडे यांनी केले. लायन्स क्लबचे प्रकल्प प्रमुख डॉ.सुचित गांधी, राणीप्रसाद मुंदडा व चांगदेव खेमनर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.