ग्राहकांच्या सोयीसाठी मुख्य शाखेत तिसरे एटीएम ः मालपाणी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर संगमनेरकरांच्या सेवेत रूजू

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर मर्चंटस् बँकेने मुख्य शाखेत तिसरे एटीएम ग्राहकांच्या सेवेत रूजू केले आहे. या तिसर्‍या एटीएममुळे ग्राहकांना अधिक वेगवान सेवा मिळेल, पैसे काढण्यासाठी कोणालाही रांगेत वाट पहावी लागणार नाही. म्हणून ग्राहकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी केले आहे.

संगमनेर शहरातच नव्हे तर जिल्ह्यात एकाच ठिकाणी तीन एटीएम मशीन असणारी ही एकमेव बँक ठरली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बँकेच्या तिसर्‍या एटीएम मशीनचे उद्घाटन प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक जनार्दन दिघे यांच्या हस्ते व प्रतिथयश व्यापारी जुगलकिशोर बाहेती यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी अध्यक्ष राजेश मालपाणी, उपाध्यक्ष संतोष करवा, श्रीगोपाल पडतानी, दिलीपकुमार पारख, प्रकाश राठी, राजेंद्र वाकचौरे, डॉ.संजय मेहता, राजेश करवा, ज्ञानेश्वर करपे, गुरुनाथ बाप्ते, सुनील दिवेकर, ओंकारनाथ बिहाणी, ओंकार सोमाणी, सीए संजय राठी, प्रकाश कलंत्री, संदीप जाजू, ज्योती पलोड, सेवक प्रतिनिधी तुकाराम सांगळे, राहुल जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सूरम, बँकेचे सर्व कर्मचारी-अधिकारी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना व्यावसायिक दिघे म्हणाले, आम्ही मर्चंट बँकेची तत्पर सेवा व पारदर्शक कारभारामुळे आता पूर्ण व्यवहार मर्चंटस्मधूनच करतो व माझ्यानंतर इतर अनेक बांधकाम व्यावसायिकही मर्चंटस् बँकेकडे आले असून तेही समाधानी आहेत. बँकेच्या एटीएममुळे मागे नोटबंदी व आता लॉकडाऊन कालावधीत संगमनेरात पैशांची कमतरता कधीच पडली नाही. इतर बँकांची एटीएम रिकामी असताना मर्चंटस् बँकेचे सर्वच एटीएम कायम पैसे देत होते याचा व्यापारी बाहेती यांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.

नोटबंदीचा कठीण काळ असो वा कोविड महामारीचा संकटकाळ असो या कसोटीच्या प्रसंगी बँकेचे एटीएम मशीन क्षणभरही विश्रांती न घेता अथवा सुट्टी न घेता शंभर टक्के कार्यक्षमतेने सेवा दिली आहे. बँकेच्या एकाही मशीनमध्ये रोकड अभावी काम थांबले असे कधीच घडले नाही. बँकेतील तंत्रज्ञाची एक टीम सतत मशीनची देखभाल करीत असल्याने तांत्रिक बिघाडामुळे सेवा खंडित झाली असे कधी घडले नाही. सुट्टीच्या दिवशीही आमचे सहकारी एटीएममध्ये कॅश भरणा करतात व तो रिकामा राहू देत नाहीत. याचा परिणाम म्हणून बँकेच्या एटीएमचा वापर करणार्‍यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. बँकेच्या दर्जेदार सेवेवर ग्राहकांनी केलेले हे शिक्कामोर्तब आहे. नवीन मशीन सुद्धा सर्वांना खूप सोयीचे व वेळेची बचत करणारे ठरेल अशी प्रतिक्रिया अध्यक्ष मालपाणी यांनी व्यक्त दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *