गुरुजनांचा सन्मान ही सर्वात मोठी कृतज्ञता ः मालपाणी
गुरुजनांचा सन्मान ही सर्वात मोठी कृतज्ञता ः मालपाणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणयासाठी शिक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. आयुष्यभर पुरेल इतके ज्ञान आणि चांगले संस्कार देऊन समर्थ पिढी घडवितात. त्यामुळे गुरुजनांचा सन्मान करणे व प्रत्येकाने एक आदर्श जीवन घडविणे ही त्यांच्या योगदानाबद्दल व्यक्त केलेली सर्वात मोठी कृतज्ञता आहे,’ असे मत संगमनेर मर्चंटस् बँकेचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी व्यक्त केले.

भारताचे द्वितीय राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक दिन कार्यक्रमात बोलताना मालपाणी यांनी वरील उद्गार काढले. संगमनेरमधील विविध शिक्षण संस्थांच्या सात प्रातिनिधीक शिक्षकांचा गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड, सह्याद्री महाविद्यालयाचे माजी प्राचार्य विजय निर्हाळी, सह्याद्री विद्यालयातील शिक्षक संजय जेडगुले, मालपाणी विद्यालयातील शिक्षिका वैशाली कोल्हे, मेहेर विद्यालयातील शिक्षक सतीष गुळवे, सराफ विद्यालयातील शिक्षक कारभारी वाकचौरे, अंजुमन प्राथमिक उर्दू विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक बाबुलाल सय्यद या सात गुरुजनांचा समावेश होता. यावेळी उपाध्यक्ष संतोष करवा, माजी अध्यक्ष डॉ.संजय मेहता, श्रीगोपाल पडतानी, प्रकाश राठी, प्रकाश कलंत्री, संदीप जाजू, राजेंद्र वाकचौरे, गुरुनाथ बाप्ते, ओंकार बिहाणी, सेवक प्रतिनिधी तुकाराम सांगळे, बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक विजय बजाज, नगरसेवक किशोर टोकसे उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष करवा यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र वाकचौरे यांनी केले.

