आत्मनिर्भरतेने सर्वांना उभारी घ्यायची आहे ः आ.विखे
नायक वृत्तसेवा, शिर्डी
‘स्वच्छ शिर्डी, सुरक्षित शिर्डी’ या विचाराने उद्याचे भविष्य आपल्याला घडवायचे आहे, कोविड संकटाने हतबल न होता पुन्हा आत्मनिर्भरतेने आपल्या सर्वांना उभारी घ्यायची आहे. येथील हॉटेल व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आणि रोजगार निर्मीतीसाठी मोठ्या कंपन्यांची गुंतवणूक या भागात आणण्यासाठी आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
शिर्डी नगरपंचायतीच्यावतीने शहरात विकसित करण्यात आलेल्या कामांचा लोकार्पण सोहळा आमदार विखे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शहरात उभारण्यात आलेल्या डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन आणि खंडोबा कॉम्प्लेक्सचे भूमिपुजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, अनिता जगताप, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे यांच्यासह सर्व समित्यांचे सभापती, नगरसेवक आणि आधिकारी उपस्थित होते. कोविड संकटात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाचे धडे देऊन गुगल कंपनीने गौरवीत केलेले अजमत इकबाल या शिक्षकाचा नागरी सत्कार आमदार विखे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत गटई कामगार आणि दिव्यांग व्यक्तिंना मदतीच्या धनादेशाचे वितरण नगरपंचायतीच्यावतीने करण्यात आले.